आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पितृपक्षाला सुरुवात:श्राद्धासाठी पत्रावळीच्या मागणीत मोठी वाढ ; अनेकांना 15 दिवसांसाठी मिळाला रोजगार

बुलडाणा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सव संपताच भुलाबाईची स्थापना करण्यात आली व त्यानंतर लगेच पितृपक्षालाही सुरुवात झाली. लागोपाठ येणाऱ्या या उत्सवांमुळे बाजारातील मंदी कमी होत असतानाही पितृपक्षांमुळे पत्रावळीची मागणी वाढल्याने ग्रामीण भागातील मजूर असो वा गरीब माणूस असो त्यांच्या हाताला पंधरा दिवस तरी काम मिळाले आहे. पळसाच्या किंवा मोहाच्या पानाच्या पत्रावळ्या बनवुन त्या बाजारपेठेत ते स्वतःच विक्रीस आणत आहेत.

आपल्या पूर्वजांप्रती स्नेह, नम्रता व श्रद्धा युक्त कर्म करणे म्हणजेच श्राद्ध होय. भारतीय संस्कृतीत श्राद्ध महत्वाचे स्थान आहे. २५ सप्टेंबरला सर्वपित्री अमावस्या तर १९ सप्टेंबरला अविधवा नवमी आहे. या अविधवा नवमीला दिवंगत आई आणि वडिलांचे एकत्रित श्राद्ध करतात. तर सर्वपित्री अमावस्येला ज्या लोकांना कोणत्याही कारणाने पितृश्राद्ध करता आले नाही ते सर्वच लोक पितरांचे श्राद्ध करतात. त्यामुळे या अमावस्येला सर्वपित्री अमावस्या असे म्हणतात. पुराणात म्हटले आहे की, पितृपक्ष पंधरवड्यात आपल्या पूर्वजांचे आत्मे आपल्या घरात येतात व श्राद्ध झाले की, संतुष्ट होऊन आपल्या वंशजांना आशीर्वाद देऊन परत जातात. अशा बऱ्याच पुराण कथा आहेत. या पितृपक्षात पित्र जेऊ घालतात. त्यामुळे घरातील किराणा मालाचे बजेट वाढत असल्याने तेला-मिठापासुन तर दही दुधापर्यंतची मागणीही आता वाढू लागली आहे. बहुतांश घरी पित्र घालण्याची पध्दत आजही सुरु असून आपल्या पूर्वजांसाठी हे पित्र घालताना त्यासाठी पळसाची किंवा मोहाच्या पानाचीच आवश्यकता भासत आहे. सध्या हिरवेगार रान असल्याने मोहाचे व पळसाची हिरवीगार पाने उपलब्ध होत आहेत. बाजारपेठेतील दुकानावर मात्र जुन्या पत्रावळ्या मिळत आहेत. ताज्या पत्रावळयांना दहा रुपयाला एक असा भाव सध्या मिळत आहे. भादोला येथील जयेश जैन यांनी मोहाच्या पानाची दररोज सकाळी विक्री होत असल्याचे सांगितले.

पितृपक्षात या गोष्टी लक्षात ठेवाव्या
पितृपक्षात काही गोष्टी शक्य तितक्या या गोष्टी लक्षात ठेवाव्या. पितृपक्षात ‌दारावर आलेल्या,कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये. पित्र कोणत्याही रुपात दारावर येऊ शकतात, म्हणून प्रत्येकाचा ‌आदर करावा. कोणत्याही पशू-पक्षी, जनावरे यांना ‌त्रास देऊ नये अथवा त्यांना जखमी किंवा मारू नये. त्यांना चारापाणी किंवा धान्य द्यावे. खोटे बोलणे, अनैतिक काम करणे टाळावे, कोणाविषयी चुकीचे विचार मनात ठेवू नये, असा पूर्वापार समज आहे.
-दिवाकर‌ नायडू, बुलडाणा.

बातम्या आणखी आहेत...