आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील लिंग गुणोत्तर प्रमाणात बुलडाणा सर्वात खाली आहे. मागील वर्षीच्या नोंदणीत एक हजार मुलांमागे ८६२ मुली आढळून आल्या होत्या. मात्र यावर्षी एप्रिल ते ऑगस्ट च्या नोंदणीत एक हजार मुलामागे ९०९ मुलींचे प्रमाण दर्शवण्यात आले आहे. अजूनही मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेत कमी असण्यामागे अवैध गर्भपात व लिंग तपासणीच कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. तर अवैध गर्भपात असो वा लिंग तपासणी ही बोगस डॉक्टर करत असल्याचाही प्रकार याला जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे.
शिकलेली आई घरादाराला पुढे नेई, अशा म्हणीचा सर्रास वापर करत व बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश देत जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने प्रत्येक शासकीय भिंतीवर सध्या रंगरंगोटी केलेली आहे. गेल्या पाच सहा महिन्यांपासून हा उपक्रम शासनाच्या निधीतून राबवल्या गेला आहे. परंतु, त्याचा कोणताच फरक लेक वाचवण्यासाठी झालेला दिसत नाही.
उलट एप्रिल ते ऑगस्ट महिन्यातील आकडेवारी सांगते की जिल्ह्यात १२ हजार ५१९ मुलांचा जन्म या दरम्यान झाला आहे. परंतु, जिवंत जन्मलेल्या मुलांची संख्या ९१७५ असून जन्मलेल्या जिवंत मुलींची संख्या ८३४४ इतकी आहे. म्हणजे ८३१ मुली मुलांपेक्षा कमी जन्माला आल्या आहेत. हे प्रमाण मुलींचे प्रमाण बुलडाणा जिल्हयात कमी असल्याचे दाखवत आहे. मागील वर्षीही ८६३ इतके प्रमाण दाखवण्यात आले आहे. याला जबाबदार कोण आहे. आरोग्य यंत्रणेचा वचक अवैध गर्भपात केंद्रावर राहिला नाही. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे सोनोग्राफी करण्याची मागणीला मंजुरी न मिळताच सोनोग्राफी कशी केली जाते. असे अनेक संशय लेकींची कमी होत असलेली संख्या दाखवत आहे. जिल्ह्यात १८८ सोनोग्राफी केंद्र असून ९९ अधिकृत गर्भपात केंद्र आहे. अजुनही एकाही केंद्रावर वर्षभरात कारवाई झाली नाही.
छुप्या पद्धतीने होते भ्रूण हत्या
स्त्री- पुरुष जनन दरातली तफावत आजही या विकसित युगात दिसून येते. दिवसेंदिवस स्त्रियांवर वाढणारे अत्याचार, असुरक्षितता, आर्थिक असमानता, स्त्रियांचा धर्म भोळेपणा, अंधश्रद्धा या बाबी मुळात कळीचा मुद्दा आहे. पुरुष प्रधान संस्कृतीत पुरुष श्रेष्ठची भावना अगदी मजबूत पकड घेवून आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत, मुलींना उच्च शिक्षणाची, नोकऱ्यांची, तसेच जवळ जवळ सर्वच क्षेत्रात सक्षमता सिद्ध करण्याची संधी स्त्रियांना मिळणे आणि त्यांनी त्यात आपली कुशलता, बुद्धिमत्ता, क्षमता दाखवली आहे परंतु,आजही समाजामध्ये छुप्या पद्धतीने स्त्री भ्रूण हत्या होत आहेत.-शाहिना पठाण, स्त्री मुक्ती संघटना, बुलडाणा
ठोस पुरावे नसल्याने होत नाही कारवाई
चोवीस आठवड्यापर्यंत गर्भपात केल्या जाते. परंतु, त्यानंतरच्या गर्भपातासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांची परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु, असे होताना दिसत नाही अनेक बोगस डॉक्टर हे परस्परच गर्भपात करुन टाकतात. असे अनेक बोगस डॉक्टर जिल्हयात आहे मात्र त्यांच्या बाबत माहिती दिल्या जात नाही. सोनोग्राफीचे प्रकारही असेच आहे. मात्र त्याची माहिती मिळत नाही. ठोस पुराव्याशिवाय काही केल्याही जात नाही. तरी अवैध गर्भपात असो वा सोनोग्राफी केंद्रावर केले जाते. पण कळवल्या जात नाही. शासनाने पीसी पीएनडीटी अंतर्गत कळविण्यास एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. -वंदना तायडे, अध्यक्ष पीसीपीएनडीटी बुलडाणा
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.