आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्थांनी दिले समस्यांचे निवेदन:चांडोळ गावात मागील काही महिन्यांपासून अवैध धंद्यांना उधाण

चांडोळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवर वसलेल्या चांडोळ गावात मागील काही महिन्यांपासून अवैध धंद्यांना उधाण आले आहे. वरली, मटका, ऑनलाइन चक्री, जुगार तसेच विना परवाना दारू विक्री उघडपणे सुरू आहे. असे अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कोणाचाच वचक राहिलेला नसून संबंधित विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी सदर धंदे बंद करण्याच्या मागणीचे निवेदन पोलिस अधीक्षक यांना दिले आहे.

निवेदनात नमुद आहे की, या अवैध धंद्यांमुळे गोरगरीबांची कुटुंबे उध्वस्त होऊन उघड्यावर आली आहे. कोणाच्या आशीर्वादाने अवैध धंद्याची दुकाने थाटलेली आहे.हे परिसरातील ग्रामस्थांना न समजणारे कोडे आहे.मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण झाले आहे. रोज लाखो रुपयांची उलाढाल गुटखा विक्रीतून,अवैध वरली मटक्यातून, चक्रीतून, जुगाराच्या खेळातून तसेच अवैध दारू विक्रीतून होत आहे. त्यामुळे या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी सरपंच सुनील महेर, पोलिस पाटील पंकज देशमुख,तंटामुक्त अध्यक्ष सुरेश धणावत व गावातील सुज्ञ नागरिकांनी केली आहे.

बसस्टँड परिसरात तसेच गावातील मुख्य चौकात राजरोसपणे अवैध दारू विक्री, वरलीचे आकडे, ऑनलाइन चक्री,जुगार भरदिवसा खेळला जात आहे. या रस्त्यावरून शाळा,महाविद्यालयीन मुले - मुली,तसेच महिलांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात वापर आहे. मात्र एवढे असून सुद्धा संबंधित विभागाने केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे. अशी ओरड ग्रामीण भागातील नागरिक करीत आहे. तरी गावातील व परिसरातील सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी बुलडाणा पोलिस अधीक्षक कार्यालयात निवेदन देऊन केली आहे. तसेच हे अवैध धंदे बंद न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर सरपंच सुनील महेर, तंटामुक्त अध्यक्ष सुरेश सिंग धनावत, पोलिस पाटील पंकज देशमुख,माजी पंचायत समिती उपसभापती भानुदास राऊत, माजी सरपंच दिलीप उसारे, ग्रामपंचायत सदस्य भरत पाकल, आत्माराम सोनुने, कैलास मोरे यांच्या सह्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...