आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील काही महिन्यांपासून तालुक्यातील नदी, नाल्यांना वाळू तस्करांची काळी नजर लागली आहे. दिवसरात्र सर्रास वाळूचे उत्खनन करून त्याची ट्रॅक्टर, टाटा ४०७, डीसीएम व इतर वाहनातून अवैधरीत्या वाळूची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे नदी, नाल्यात मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. दिवसाकाठी शेकडो ब्रास वाळूची तस्करी करून त्याची वाहतूक करण्यात येत आहे. या वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठ-मोठ खड्डे पडले आहेत. वास्तविक पाहता तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व महसूल कर्मचारी दररोज याच रस्त्याने ये जा करतात. परंतु तरी सुद्धा या अवैध वाहतुकीकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे शासनाला लाखो रुपयांचा फटका बसत आहे. दिवसाढवळ्या वाळूची अवैध वाहतूक सुरू असतांना महसूल प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. त्यामुळे कुठेतरी पाणी मुरत असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता वाळू तस्करीवर आळा घालण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
आदिवासी बहुल असलेल्या संग्रामपूर तालुक्यात पूर्णा, वाण, केदार, लेंडी, सातलोन, पांडव या नद्यांसह अनेक वाळू उत्पादित नाले आहेत. या नदी नाल्यातून नियमबाह्य रेतीचे उत्खनन करून त्यांची ट्रॅक्टर, टाटा ४०७ टिप्पर यासह इतर वाहनातून सर्रास वाहतूक करण्यात येत आहे. या भरमसाठ वाळू उपशामुळे नदी नाल्यात पाण्याचे सिंचन न होता ते सरळ वाहून जात आहे.
त्यामुळे भविष्यात नदी काठावरील गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. शिवाय जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता येणाऱ्या पावसाळ्यात तालुक्याला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. त्यातच नदी, नाल्यातून दिवसाढवळ्या वाळूची चोरटी वाहतूक सुरू आहे. हीच वाळू बांधकाम मालकांना हे वाळू तस्कर अव्वाच्या सव्वा भावाने विकून आपली तुंबडी भरत आहे. वास्तविक पाहता गौण खनिजाला आळा बसावा म्हणून तहसील प्रशासनाने पथकाची निर्मिती केली आहे. परंतु या वाळू तस्करांकडे हे पथक हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे कुठेतरी पाणी मुरत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.