आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध धंदे:डोणगाव परिसरात अवैध धंदे जोमात, ग्रामस्थांमध्ये पोलिसांविरोधात रोष ; कारवाई करण्याची होतेय मागणी

डोणगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही महिन्यांपासून डोणगाव परिसरात वरली मटक्यासह अवैध व्यवसायाला ऊत आल्याचे चित्र आहे. परिसरात खुलेआम अवैध धंदे जोमात सुरू असतानादेखील स्थानिक पोलिसांकडून कुठलीच कारवाई करण्यात येत नाही. ठोस कारवाई होत नसल्याने पोलिस प्रशासनाची असलेली भीती कमी झाल्याने तरुणांचे देखील पाऊल गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहे. त्यामुळे सूज्ञ ग्रामस्थ पोलिस प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त करत आहेत. परिसरात सुरू असलेले अवैध धंदे वेळीच बंद केले नाहीत तर मोठा अनर्थ घडू शकतो. त्यामुळे वरिष्ठांनी देखील याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गजर निर्माण झाली आहे.

डोणगाव हे बुलडाणा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर येत असून या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे. परिसरातील ३० ते ३५ खेड्यातील नागरिक येथे खरेदीसाठी येतात. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते, याचाच फायदा घेत काही व्यावसायिक खुलेआम अवैध धंदे चालवत आहे. तर वरली मटक्याच्या अवैध व्यवसायाला जणू ऊतच आली आहे. त्यांची दुकाने जुन्या बैल बाजारात व आठवडी बाजारात उपलब्ध होत असल्याने पैशाच्या लालसेपोटी सर्वसामान्य नागरिक मात्र उद्ध्वस्थ होत आहे.

डोणगावच नव्हे तर अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी इतर ग्रामीण भागातही आपले अवैध व्यवसायाचे जाळे पसरवले आहे. त्यामध्ये बेलगाव, ईश्वी, घाटबोरी, लोणी गवळी, शेलगाव, पांगरखेड आणि गोहगाव यासह आदी गावांचा समावेश आहे. परंतु हा सर्व प्रकार पोलिस प्रशासनाच्या निर्देशनास का येत नाही? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना कायम सतावत आहे.

वरलीचे आकडे घेण्यासाठी नागरिक, काही तरूण हे नियमित आठवडी बाजार, बैल बाजारात तर काही बस स्थानकाजवळील हॉटेल जवळ बसून वरलीचे आकडे घेत असल्याचे खुलेआम दिसत आहे.

यामुळे तरूण पिढीचे आयुष्य उद्ध्वस्त होत असून अनेकांचे संसार उघड्यावर येत आहे. घरात पैसे नसल्यामुळे अनेकांच्या मुलाबाळांना उपाशी पोटी झोपण्याची वेळ येत आहे. त्यामुळे कोवळ्या वयात बालकेही चोरीच्या घटनेकडे वळत आहे. सामाजिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी स्थानिक पोलिसांनी व स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी वेळीच डोणगाव परिसरात सुरू असलेले सर्व अवैध धंदे बंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अवैध धंद्यांविरोधात कारवाईची मागणी विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांकडून पोलिसांकडे केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...