आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संग्रामपूर:संग्रामपूर तालुक्यात अवैध वृक्षतोड जोमात; वन विभागाचे दुर्लक्ष

संग्रामपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही दिवसांपासून तालुक्यात अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. परंतु याकडे वन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देवून परिसरात होणारी अवैध वृक्ष तोड थांबवावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

तालुक्यातील एकलारा येथील शासकीय इ क्लास पस्तीस एकर जमिनीवरील जवळपास साठ ते सत्तर जुने लिंबाचे झाडे अज्ञात लोकांनी ५ एप्रिल रोजी कटरच्या साहाय्याने कापून नेल्याचे गावातील नागरिकांनी पाहिले. यावेळी ग्रामस्थांनी लाकूड तस्करांना हटकले असता ते पळून गेले. तत्पूर्वी त्यानी पाच ते सहा झाडाची कटाई केली होती. या बाबत नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनास विचारणा केली असता त्यांना या बाबतीत कुठलीही माहिती नव्हती अथवा त्यांनी झाडे तोडण्याची परवानगी दिली नसल्याचे समोर आले आहे.

त्यानंतर नागरिकांनी वन परिक्षेत्र अधिकारी कटारिया यांना फोन करून माहिती दिली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर सांगितले की, जळगाव जामोदला येऊन लेखी तक्रार करा, मग मी कर्मचारी पाठवतो असे सांगितले. दरम्यान, हे वृक्ष चोर अकोट येथील असल्याची माहिती आहे.ही वृक्षतोड अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू होती. असा आरोप एकलारा येथील नागरिकांनी केला आहे. या वृक्ष कटाईबाबत वन मंत्री व मुख्यमंत्री यांना मेल द्वारे तक्रार करणार असल्याची माहिती देखील गावकऱ्यांनी दिली.

अवैध वृक्षतोड थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन
५ एप्रिलच्या पहाटे चार वाजेपासून अकोट येथील काही अज्ञात व्यक्तींनी पस्तीस एकर क्षेत्रातील जुन्या निंबाच्या झाडांची कत्तल केली. सकाळी आठ वाजता ट्रक मध्ये कापलेली लाकडे भरत असताना मी व गावातील काही नागरिक तेथे गेलो. त्यावेळी लाकूड तस्कर ट्रक घेऊन पळून गेले.

त्यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी कटारिया यांना फोन करून याची माहिती दिली. परंतु त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून त्वरित अवैध वृक्षतोड थांबवावी, अन्यथा गावकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल. -गणेश हागे, पोलिस पाटील एकलारा.

बातम्या आणखी आहेत...