आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहळा:सिंदखेडराजातील गणपतींचे अकराव्या दिवशी विसर्जन

सिंदखेडराजा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री गोसावी नंदन संस्थान गणपतीचे अकराव्या दिवशी विसर्जन होत असल्याने शहरातील गणेश मंडळांनी देखील ही परंपरा मानून आपल्या सार्वजनिक गणपतींचे ९ सप्टेंबर शनिवार रोजी विसर्जन केले. दरम्यान, दुपारी तीन वाजे पासूनच विविध भागातील सार्वजनिक गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली होती. या मिरवणुकीतील जिवंत देखावे हे खास वैशिष्ट ठरले. रात्री अकरा वाजे पर्यंत विसर्जन करण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या होत्या.

गणपती विसर्जन मिरवणुकीत जिवंत देखावे हे येथील वैशिष्ट आहे. मुलीचा जन्मदर कमी असल्याने उपवर मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याचा देखावा व्यापारी गणेश मंडळाने सादर केला. महात्मा फुले मंडळाने केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकारली, विघ्नहर्ता गणेश मंडळाने रोही प्राण्यांमध्ये शेताची नासाडी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा देखावा केला. तर ऐतिहासिक चांदणी तलावाची भिंत पडल्याने ऐतिहासिक ठेवा नष्ट होत असल्याचा संदेश देणारा देखावा सिद्धिविनायक मंडळाने सादर केला. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या बलिदानामुळे आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असल्याचा देखावा सावित्रीबाई फुले मंडळाने केला होता. प्लास्टिक चे दुष्परिणाम दाखवणारा देखावा डायमंड मंडळाने सादर केला. देशभक्ती दाखवणारा देखावा त्रिगुणी गणेश मंडळाने सादर केला.

बाल सावता मंडळाने सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामांचा देखाव्या ने सर्वांचे लक्ष वेधले. माणिक चौक येथे नगर परिषद वतीने उत्कृष्ठ देखावा सादर करणाऱ्या गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.संपूर्ण मिरवणुकीत कोणताच अनुचित प्रकार,घटना घडू नये यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी विलास येमावर, पोलिस निरीक्षक केशव वाघ, उपनिरीक्षक मधुसूदन घुगे, युवराज राठोड, जीवन सोनवणे, भारत चिरडे, प्रदीप वायाळ, राहुल मेव्हणकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. गणेश उत्सवानिमित्त शहरातील भाविकांमध्ये सर्वत्र एक मोठा उत्साह दिसून येत होता.

मानाच्या गोसावी नंदन,देशपांडे गणपतीचे औक्षण
येथील मानाचा संस्थान गणपती गोसावी नंदन व देशपांडे गणपतीचे महिलांनी सडा रांगोळी करून प्रत्येक घरासमोर औक्षण केले. हे दोन्ही गणपती चारशे वर्षांपासून परंपरेने बसवले जातात. यानिमित्त परिसरात उत्साहाचे वातावरण होते.

बातम्या आणखी आहेत...