आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष:कर्मचाऱ्यांच्या ‘अप-डाऊन’मुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम

सिंदखेडराजा / नंदू वाघमारे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सर्वच शासकीय कार्यालयातील बहुतांश कर्मचारी हे मुख्यालयी न राहता अन्य शहरातून अप-डाऊन करत आहेत. त्यामुळे ते वेळेवर कार्यालयात पोहोचत नाहीत. परिणामी शासकीय कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. केवळ अप-डाऊन नव्हे तर कार्यालयात येण्याच्या वेळा देखील पाळल्या जात नसल्याने असंख्य नागरिकांची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे ग्रामस्थ कार्यालयात चकरा मारून थकले आहेत. या गंभीर बाबीकडे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने न्याय कोणाकडे मागावा, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

सरकारी काम काही दिवस थांब, या म्हणीप्रमाणे सरकारी कार्यालयातील कामकाज चालत आहे. शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे शहरात विविध विभागांची शासकीय कार्यालये आहेत. परंतु कर्मचार्याच्या अपडाऊन धोरणामुळे अनेक कार्यालयात अधिकारी वेळेवर हजर रहात नाही. अशी ओरड नेहमीच नागरिक करीत आहेत. वास्तविक पाहता शासकीय कामकाजाच्या वेळा शासनाने ठरवून दिल्या आहेत. या आधी सात दिवस काम चालत असे. परंतु आता शनिवारची सुटी जाहीर झाल्याने सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस शासकीय कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. पाच दिवस शासकीय काम चालत असल्याने शासनाने ऐका आदेशान्वये शासकीय कामाच्या वेळा बदलल्या आहेत. त्यामुळे आता सकाळी साडे नऊ वाजता शासकीय कार्यालये सुरू होत असून सायंकाळी सव्वा सहा वाजता कार्यालय बंद करण्यात येतात. शासनाने जवळपास पाऊण तास कर्मचाऱ्यांचा वेळ वाढवला आहे. परंतु या वेळा सरकारी कर्मचारी पाळत नसल्यामुळे त्याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

अप-डाऊन नंतरही घरभाडे भत्ता वसूल
शासनाने प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यास मुख्यालयी राहण्यास बंधनकारक केले आहे. परंतु बहुतांश अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी न राहता बाहेर गावावरून अप-डाऊन करत आहेत. तर दुसरीकडे दरमहा मुख्यालयी राहण्याचा घर भाडे भत्ता वसूल करीत आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देण्याची गरज आहे.

त्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात येईल
तालुकास्तरावर जनजागृतीचा कार्यक्रम असल्यामुळे काही कर्मचाऱ्यांना व्यवस्था पाहण्याचे काम दिले होते. तर काही कर्मचारी सकाळचे दहा वाजून ही कार्यालयात हजर नव्हते. त्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून कारवाई करण्यात येईल.
-वसंत राठोड, तालुका कृषी अधिकारी

माझ्याकडे तीन तालुक्याचा पदभार आहे
सहायक निबंधक कार्यालयात तीनच कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी एक आजारी असून दुसऱ्याला बस मिळाली नाही. तर माझ्याकडे देऊळगाव राजा, सिंदखेडराजा व लोणार अशा तीन तालुक्यांचा पदभार आहे.
-एस. बी. शितोळे, सहायक निबंधक

वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज
तालुक्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक व्यवस्था करावी. जेणेकरून अधिकारी व कर्मचारी वेळेत कार्यालयात येतील. सिंदखेडराजा हहा तालुका मोठा असून साखरखेर्डा येथून पन्नास कि. मी. अंतरावर आहे. तेथून लोकांना अधिकारी कर्मचारी वेळेत भेटत नसल्याने रिकाम्या हाताने परत जावे लागते. लोकांची कामे वेळेवर होत नाही, ही बाब अत्यंत गंभीर असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
-सतीश काळे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

बातम्या आणखी आहेत...