आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन शेतमाल येण्यास साधारणतः सप्टेंबरपासून सुरुवात होते. सप्टेंबर ते फेब्रुवारीपर्यंत बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक असते. सप्टेंबरमध्ये नवीन उडीद, मूग बाजार समितीमध्ये विक्रीस येतात. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात नविन सोयाबीन विक्रीस येते. नोव्हेंबर महिन्यापासून बुलडाणा जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातून सोयाबीनची जवळपास दररोज १५ ते २० हजार क्विंटल इतकी आवक असते.
सध्या बाजार समितीमध्ये सोयाबीन, तूर, भुईमुग, शेंग वगळता अन्य शेत मालाची आवक रोडावली आहे. त्यामुळे बाजार समितीमधील यार्डमधील शेतकऱ्यांची संख्या कमी दिसून येत आहे. सध्या बाजार समितीमध्ये नविन उन्हाळी भुईमूग बाजारात विक्रीस आला आहे. त्या भुईमुगाला ३ हजार ५०० ते ६ हजाराच्यावर भाव मिळत आहे. चार दिवसाच्या कालावधीत या बाजार समितीत ८२४ क्विंटल भुईमूग व्यापाऱ्यांच्या पारड्यात मोजून दिला आहे.
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळखल्या जात आहे. या बाजार समितीमध्ये बुलडाणा जिल्ह्यासह अकोला व वाशीम या जिल्ह्यातील शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी आणतात. त्याप्रमाणे या बाजार समितीमध्ये सध्या भुईमूग मोठ्या प्रमाणावर विक्रीस येत आहे. यंदा खामगाव तालुक्यात ४,५०० हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी भूईमुगाची पेरणी केली. गतवर्षी पावसाळ्यात ब्रेक घेत घेत चांगला पाऊस पडला. त्यामुळे तालुक्यातील मन, तोरणा, मस, ज्ञानगंगा, ढोरपगाव यासह अन्य मध्यम व लघु प्रकल्प पाण्याने तुडुंब भरले होते. त्यामुळे या प्रकल्प क्षेत्रात येणाऱ्या गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. या प्रकल्प क्षेत्रातातील शेतकऱ्यांनी आपले उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यासाठी या प्रकल्पातून पाणी घेवून रब्बी व उन्हाळी पिके घेतली. यंदा उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी भुईमुगाला प्राधान्य देत त्याचे उत्पादन घेतले. मागील दहा ते बारा दिवसापासून येथील बाजार समितीमध्ये भुईमूग विक्रीस येत आहे. तर किरकोळ बाजारात ५० ते ६० रुपये किलो दराने भूईमुगाची विक्री होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.