आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:साखरखेर्ड्यात पोलिसांनी ‘अंडे का फंडा’ वापरला; नवरा-बायकोमध्ये झालेला वाद सहज मिटवला

साखरखेर्डा (जि. बुलडाणा)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पतीने आणलेली दोन अंडी पत्नीने मुलांना खाऊ घातल्याने वाद

पती-पत्नींचं नातं तसं अतूट... साताजन्माचं. परंतु, घर म्हटलं की भांड्याला भांडं लागायचंच. मग यातून वादही होणारच. अगदी क्षुल्लक भाताच्या शितावरून पेटलेला वाद किती विकोपाला जाईल, सांगणे कठीणच! इथे या प्रकरणात मात्र भात-भाजीवरून नव्हे, चक्क बॉइल अंड्यांवरून नवरा-बायकोत जुंपली. कारण सापडलं आणि भांडण पेटलं... इतकं की ते पोलिसात गेलं. अखेर पोलिसांनीही शक्कल लढवली आणि दोन अंडी देऊनच हा वाद मिटवला.

घडलं असं की, येथील भीमनगरमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबातील पतीने स्वत:साठी दोन बॉइल अंडी घरी आणून ठेवली अन् बिचाऱ्या पत्नीने लाडक्या मुलांना ती खाऊ घातली. कारण अगदी क्षुल्लक, पण मुलांना अंडी खाऊ घातल्याने उपाशी राहावे लागल्याचा राग पतिराजांना काही आवरेना. भांडणही थांबेना... भांडण इतके वाढले की ते थेट पोलिसांत गेले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या गोंधळात बंदोबस्तात गुंतलेल्या बिचाऱ्या पोलिसांवर आता नवरा-बायकोतील वाद मिटवण्याची वेळ आली. धड गुन्हा दाखल करता येईना आणि वादही मिटेना, अशी पोलिसांची अवस्था झाली.

अनेक कौटुंबिक कारणांमुळे पती-पत्नींत होणारे वाद मिटवण्यासाठी जिल्हा पोलिस मुख्यालयात महिला तक्रार निवारण कक्ष आहे. येथे रोज येणाऱ्या तक्रारींतील वादामागे नेहमीची कारणे असतात. मात्र, अंड्यांवरून पेटलेला आणि मिटलेला हा वाद विरळाच ठरला.

पोलिसांनी लढवली शक्कल

ठाणेदार जितेंद्र आडोळे आणि दीपक राणे यांनी नवरा-बायकोतील हा वाद डायरीत नोंद न करताच मिटवण्याचे ठरवले. राणे यांनी संतापलेल्या पतीला जावयासारखी वागणूक देत न्यायासाठी हक्काने माहेर समजून ठाण्यात आलेल्या महिलेस लेक मानून प्रेमाने वागणूक देत दोन बॉइल अंडी ठाण्यात मागवली. आता पतीला घास भरवून वाद मिटवण्यास सांगण्यात आले... आणि खरंच वाद मिटला.