आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Buldhana
  • Increase The Height Of 'Ekburji' To Overcome Water Scarcity In Washim City; Statement To The Chief Minister Through The District Collector On Behalf Of The Deprived Bahujan Alliance |marathi News

लोकप्रतिनिधींचे मौन:वाशीम शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ‘एकबुर्जी’ची उंची वाढवा; वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

वाशीम16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे एकबुर्जी धरणातून वाशीमकरांना पुरेसे पाणी मिळत नाही. उन्हाळ्यात नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागते. या पाणीटंचाईच्या समस्येवर मात करुन नागरिकांना दिलासा देण्यासाठी एकबुर्जी धरणाची उंची वाढवण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

बुधवारी वंचितच्या प्रदेश सदस्या किरण गिऱ्हे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष डॉ. गजानन हुले, जिल्हा महासचिव सोनाजी इंगळे, जिल्हा सचिव उत्तम झगडे, तालुकाध्यक्ष नारायण खोडके, बालाजी राऊत, अनिल कांबळे, जिल्हा सचिव वसंतराव हिवराळे, तालुका महासचिव संजय पडघान, तालुका उपाध्यक्ष प्रविण मोरे, किशोर खडसे, शालिग्राम खडसे, उमेश राऊत उपस्थित होते.

निवेदनात म्हटले, सद्य स्थितीला वाशीम शहराची लोकसंख्या १ लाख २४ हजार ४६५ आहे. जिल्ह्यात एकबुर्जी, सोनल, अडाण मध्यम प्रकल्प आहेत. तर १३१ लघु सिंचन प्रकल्प आहेत. शहराची तहान भागवण्यासाठी व शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी एकबुर्जी प्रकल्पाची उंची वाढवण्याची मागणी गेल्या १५ वर्षापासून वाशीमकरांच्या वतीने करण्यात येत आहे. याबाबत अनेक नागरिकांना शासनाला निवेदनेही दिली आहेत. मात्र, तांत्रिक बाबी समोर करून हा प्रस्ताव लालफितीत गुंडाळून ठेवण्यात आला आहे. तात्कालिन नगराध्यक्ष स्व. रामचंद्र राठी यांच्या कार्यकाळात १९६४ साली एकबुर्जी प्रकल्प उभारण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांनी यासाठी निधी मंजुर केला होता. तेव्हापासून आजतागायत या प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा सुरू असून जवळच्या अनेक खेड्यांमधील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी पुरवले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत शहराचा झपाट्याने विस्तार होण्यासोबतच लोकसंख्याही वाढली. त्या तुलनेत एकबुर्जी प्रकल्प कुचकामी ठरत असल्याने प्रकल्पाची उंची वाढवणे गरजेचे आहे. याकडे शासनाने लक्ष देवून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी जनतेची मागणी आहे.

आजघडीला एकबुर्जी धरण वाशीमकरांची तहान भागवण्यासाठी असमर्थ असल्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात वाशीमकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मात्र आपल्या राजकारणात मग्न असून वाशीमकरांच्या या प्रश्नावर मौन धारण करुन आहेत. एकबुर्जी धरणाची उंची २३.७ मीटर असून त्यात पाणी साठवून ठेवण्याची क्षमता १४.१ एमसीएम इतकी आहे. या धरणाची उंची २४.७ मीटर केल्यास, एक मीटर वाढवल्यास शहराला वर्षभर पाणी पुरेल.

दरवर्षी पाणीपट्टीची वसूली
पिण्याचे अपुरे पाणी मिळूनही जनतेकडून वर्षभराचा पाणी कर नगर परिषदेकडून वसूल केला जातो. ही अन्यायकारक बाब असून वाशीमकरांना पुरेसे पिण्याचे पाणी व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एकबुर्जी धरणाची उंची वाढवणे हाच यावर एकमेव उपाय आहे. या बाबींचा गांभिर्याने विचार करुन एकबुर्जी धरणाची उंची वाढवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...