आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविदर्भ पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथे दर्शनासह पर्यटनासाठी लाखो भाविकांची ये-जा असते. त्यामुळे शेगाव येथील रेल्वे स्थानकावर आधुनिकीकरणासह सुविधांचा दर्जा वाढवा. सोबतच या ठिकाणाहून जाणाऱ्या प्रत्येक गाडीला शेगावात थांबा मिळावा, अशी आग्रहाची मागणी केंद्रीय ग्राम विकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांनी केली आहे.
दिल्ली येथे संसदेचे अधिवेशन सुरू आहे. यामध्ये लोकसभेत खासदार प्रतापराव जाधव यांनी बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रश्नावर केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. यात नियम ३७७ नुसार शेगाव येथील रेल्वे स्थानक व सुविधांच्या बाबतीत त्यांनी मागणी रेटून धरली आहे. यावेळी खासदार प्रतापराव जाधव म्हणाले की, बुलडाणा लोकसभा मतदार संघातर्गत येणारे शेगाव हे सद्गुरु श्री संत गजानन महाराज यांची पावनभूमी आहे.
देश- विदेशातून श्री गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखो भाविक शेगाव येथे येतात. सेवा आणि समर्पण भावनेने शेगाव संस्थानचे कार्य सुरु आहे. भक्तांमध्ये देव शोधणारे गजानन महाराज संस्थान असून ८० टक्के स्वयंसेवक येथे निशुल्क सेवा देतात. संस्थानव्दारा संचालित या केंद्रामधील स्वच्छतेची किर्ती जगभरामध्ये आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील तसेच भाविक अबाल वृद्ध दररोज शेगावला येतात. रेल्वेमुळे दळण वळणाची चांगली सुविधा उपलब्ध आहे. येथील स्थानकाला अ वर्ग दर्जा देखील मिळालेला आहे. प्रतिवर्षी या रेल्वे स्थानकाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये केंद्र सरकारला मिळतात. मात्र त्या तुलनेत सुविधांची गती मंदावलेली आहे.
या रेल्वे स्थानकावरून एका धार्मिक स्थळावरून दुसऱ्या धार्मिक स्थळ पर्यंतच्या अनेक रेल्वे धावतात. मात्र त्यांना शेगाव येथे थांबा नाही. रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने आवश्यक त्या सुविधांचे आधुनिकीकरण झालेले नाही. त्यामुळे या ठिकाणावरून जाणाऱ्या प्रत्येक रेल्वेला शेगाव थांबा मिळावा. तसेच प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात यावी, लिफ्टची संख्या वाढून पर्याप्त स्वरूपात एलिव्हेटर देखील वाढवण्यात यावेत, अशी आग्रही मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.