आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुभा शमीम यांचे प्रतिपादन:अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे केंद्र, राज्य सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष

बुलडाणा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुपोषणाच्या निर्मूलनासाठी शून्य ते सहा वयोगटातील मुलांना पूरक पोषण आहार देण्याची प्रक्रिया ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस या प्रत्यक्ष काम करणाऱ्या महत्त्वाच्या घटक आहेत. जर ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे, तर मग अंगणवाडी सेविका मदतनिसांना या सेवेमध्ये कायम का करण्यात येत नाही, असा प्रश्न अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य महासचिव कॉ. शुभा शमीम यांनी ११ सप्टेंबर रोजी बुलडाणा येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या चौथ्या जिल्हा अधिवेशनाचे उद्घाटन करताना सरकारला विचारला आहे.

येथील जिल्हा समाज कल्याण कार्यालयाच्या सभागृहात सिटुचे जिल्हाध्यक्ष कॉ. पंजाबराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या जिल्हा अधिवेशनासाठी स्त्रीमुक्ती संघटनेच्या जिल्हा सचिव शाहीना पठाण, समृद्धी महिला मंडळाच्या अध्यक्षा मीनल आंबेकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. कि. वा. वाघ, पुरूषोत्तम गणगे, प्रा.मधुकर वाघ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की पोषण ट्रॅकर आणून केंद्र सरकारने तीन ते सहा वर्षाच्या लहान मुलांना अंगणवाडी केंद्रात देण्यात येणारे पूर्व प्राथमिक शिक्षण बंद करण्याच्या दृष्टीने वाटचाल सूरू केली आहे. कुपोषण निर्मूलनाच्या नावाखाली या देशातील शून्य ते सहा वर्षाचे बालके, गरोदर माता व स्तनदा माता तसेच किशोरवयीन मुली इत्यादी कोट्यवधी लाभार्थ्यांची राज्य आणि केंद्र सरकारकडून मोठी फसवणूक केल्या जात आहे. पूरक पोषण आहार देताना प्रती लाभार्थ्यांच्या दरात गेल्या कित्येक वर्षापासून वाढ करण्यात आली नाही. अनेकदा पूरक पोषण आहाराचा दर्जा अत्यंत निकृष्ट असतो. शासकीय यंत्रणेच्या चुकीच्या धोरणामुळे ही योजना खासगी कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा घाट सरकारने घातला आहे, असा आरोप कॉ.शुभा शमीम यांनी केला आहे.

त्यानंतर प्रा. डॉ. कि.वा. वाघ यांनी देशातील महिला व बालकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारने किमान वेतन देऊन शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला पाहिजे, असे व्यक्त केले. तसेच आज देशातील महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तीन वर्षांच्या मुली पासून तर वयोवृद्ध महिला पर्यंत या अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अनेकदा पोलिस स्टेशन मध्ये गुन्ह्याची नोंद सुद्धा घेतली जात नाही. अंगणवाडी सेविका मदतनीस या गावपातळीवर काम करत असल्यामुळे त्यांना सरकारने सामाजिक सुरक्षितता द्यावी, असे मत स्त्रीमुक्ती संघटनेच्या शाहीना पठाण यांनी व्यक्त केले. त्यानंतर मीनल आंबेकर, प्रा.मधुकर वाघ, पुरूषोत्तम गणगे यांनी आपले विचार व्यक्त केले. अधिवेशनाची सुरूवात ध्वजारोहण करून व शहिदांना आदरांजली अर्पण करून करण्यात आली.

यावेळी विविध घोषणा देऊन परिसर दणाणून गेला. उद्घाटन सत्राचे संचालन नंदा शेळके यांनी तर आभार प्रतिभाताई वक्ते यांनी केले. दुसऱ्या सत्रात मागील तीन वर्षाचा संघटनेच्या आंदोलनात्मक आणि संघटनात्मक कार्याचा अहवाल सचिवाच्या वतीने ॲड. निशा घोडे यांनी मांडला. या अहवालावर जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातून सहभागी झालेल्या अकरा प्रतिनिधींनी सचिवांच्या अहवालावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करून चर्चेत सहभाग घेतला. शेवटी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून कॉ. पंजाबराव गायकवाड यांची फेरनिवड करण्यात आली. तर जिल्हा सचिव म्हणून प्रतिभा वक्ते यांची नव्याने सर्वानुमते निवड करण्यात आली. अधिवेशनाच्या यशस्वितेसाठी अनिल दातीर, गोपाल गिरी, गजानन अंभोरे, शाहीर डी.आर.इंगळे आणि संच यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...