आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापर्यटकांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एक कोटी ७१ लाख रुपये खर्चून बांधलेल्या नवीन विश्रामगृहातील विद्युत जोडणीचे काम अधिकारी आणि कंत्राटदाराने अंदाज पत्रकाप्रमाणे न करता निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून केले आहे. त्यामुळे क्वालिटी कंट्रोलद्वारे चौकशी करून ती पूर्ण होईपर्यंत कामाचे देयक अदा करण्यात येऊ नये. अन्यथा बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी यांनी शुक्रवार, ३ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत दिला.
लोणार हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असून, हे पर्यटनदृष्ट्या विकसित होऊन येथे येणाऱ्या पर्यटकांना उच्च प्रतीच्या सुविधा मिळण्यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. परंतु, संबंधित विभागाचे अधिकारी व कंत्राटदाराच्या संगनमताने निधीतून निकृष्ट दर्जाची कामे केली जात आहेत. शासनाने मंजूर केलेल्या नवीन विश्रामगृहाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्या बांधकामात विद्युत जोडणीसह अद्ययावत उपकरणे बसवली आहेत.
हे काम अमरावती विद्युत विभागांतर्गत करण्यात आले. कामात वापरलेले साहित्य अंदाज पत्रकाप्रमाणे नसून अत्यंत निकृष्ट प्रतीचे आहे. जोडणी करताना हलक्या प्रतीचा वायर वापरण्यात आला. बटन, स्विच बोर्ड, पंखे हेसुद्धा हलक्या प्रतीचे आहेत. अमरावती विद्युत विभागाचे उपविभागीय अधिकारी गौरकर यांनी त्यांच्या मर्जीतील कंत्राटदाराला हे काम दिले. कंत्राटदार व अधिकारी यांच्या संगनमताने निकृष्ट साहित्य वापरून विद्युत जोडणीचे काम केले आहे, असा आरोप मापारी यांनी केला. या संपूर्ण कामाची क्वालिटी कंट्रोलद्वारे चौकशी करावी.
तोपर्यंत या कामाचे देयक कंत्राटदाराला देऊ नये, तसेच या कामाचे उद्घाटन करू नये. उद्घाटन करण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेनेकडून तो कार्यक्रम उधळला जाईल, असा इशारा यावेळी प्रा. बळीराम मापारी, तालुकाप्रमुख भगवान सुलताने, युवा सेना तालुकाप्रमुख गजानन मापारी यांनी दिला. या वेळी नगरसेवक डॉ. अनिल मापारी उपस्थित होते. यावेळी निवासी नायब तहसीलदार ज्योत्स्ना परुळीकर शेतीच्या वादासंदर्भात शेतकऱ्यांना वेठीस धरून आर्थिक पिळवणूक करत असल्याचा आरोप प्रा. मापारी यांनी केला. त्यांच्या सर्व कामांची विभागीय चौकशी करून दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.