आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर पंचायतच्या नगरसेवकांमधील अंतर्गत कलहामुळे महिला व बाल कल्याण समिती सभापती खातून बी शे.रशीद यांनी आपल्या सभापती पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा गटनेता नगर पंचायत यांच्याकडे सुपूर्द केला असून त्याच्या प्रति लिपी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना दिल्या आहेत. तर पक्षश्रेष्ठी या राजीनाम्यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथील सतरा सदस्य संख्या असलेल्या नगर पंचायतची दोन टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. त्यामध्ये २१ डिसेंबर २०२१ ला तेरा जागेसाठी मतदान घेण्यात आले तर उर्वरीत चार जागांसाठी १८ जानेवारीला मतदान घेण्यात आले होते. अध्यक्ष निवडीवरून बारा सदस्यांमध्ये एकमत झाले नाही तर अध्यक्षपदासाठी इच्छुकांची यादी वाढली होती. त्यामुळे नगरसेवकांची आपसात धुसफूस वाढली होती. तेव्हापासून नगरसेवकांमध्ये अंतर्गत कलह वाढले.
परंतु ऐनवेळी पक्षश्रेष्ठींनी मध्यस्थी करून हे वाद आपसात मिटविले. परंतु अंतर्गत कलह मात्र वाढतच होता. त्यानंतर २१ फेब्रुवारीला नगर पंचायतच्या विषय समितीच्या सभापतींची प्रक्रिया पार पडली. त्यामुळे अंतर्गत कलहाचे काही प्रमाणात संपुष्टात येईल अशी आशा होती. परंतु झाले त्याचे उलटच मागील काही दिवसांपासून येथील नगरसेवकांमध्ये असलेली नाराजी दूर करण्याचा कोणीही प्रयत्न केला नसून नाराज असलेल्या नगर सेवकांची कोणीच मनधरणी केली नाही. त्यामुळे अंतर्गत कलह वाढतच गेला. नगर पंचायत मध्ये काँग्रेसची सत्ता आहे तर आमदार मात्र शिवसेनेचे असून आमदार हे शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणत आहे. त्यामुळे काही दिवसांपासून काँग्रेसचे काही नगरसेवक हे निधीसाठी आमदार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे.
त्यामुळे नगरसेवकांमध्ये आणखी धुसफूस वाढली होती एवढ्या मोठ्या प्रमाणात नगर सेवकांमध्ये अंतर्गत कलह वाढलेला असताना पक्षश्रेष्ठींनी या विषयाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे येथील नगरसेवकांना पक्षश्रेष्ठींनी एकप्रकारे वाऱ्यावर सोडल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती. आज २५ मे रोजी येथील महिला व बाल कल्याण समितीचे सभापती, प्रभाग क्र. तीन च्या नगरसेविका खातून बी शे. रशीद यांनी अंतर्गत कलहामुळे सभापती पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे येथील काँग्रेसच्या नगरसेवकांमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे तर खातून बी शे. रशीद यांनी दिलेल्या सभापती पदाच्या राजीनाम्यावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.