आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराला सातत्याने होत असलेल्या अनियमित व दुषित पाणीपुरवठा विरोधात नगर पंचायतचे विरोधी पक्षनेता सचिन हिरोळे यांच्या नेतृत्वात महिलांकडून नगर पंचायतवर घागर मोर्चा काढण्यात आला. या घागर मोर्चात महिलांनी नगर पंचायत प्रशासन विरोधी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. शहराला नियमित व शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा, असे निवेदन नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना देण्यात आले.
शहराला नगर पंचायत मार्फत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु मागील काही वर्षांपासून येथील शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड झाल्यामुळे धरणातून आलेल्या पाण्यावर कोणत्याही प्रकारची शुद्धीकरणाची प्रक्रीया न करता धरणातून आलेल्या पाण्याचा सरळसरळ शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे तसेच पाण्यात एलम व ब्लिचिंगचा वापर करण्यात येत नाही.
त्यामुळे नळातून येणारे पाणी दुषित असून त्यामध्ये जंतू आढळून येत आहेत. तसेच पाण्याचा रंग बदलून तांबट रंगाचे पाणी नळातून येत आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. तर पाणीपुरवठा करणाऱ्या मोटार पंपात सातत्याने बिघाड होत आहे. त्यामुळे शहराला अनियमित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परिणामी शहरातील नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहराला शुद्ध पाणीपुरवठा करण्यास नगर पंचायत प्रशासन अपयशी ठरत आहे.मुख्याधिकारी, नगराध्यक्ष यांच्या दालनात ए.सी. बसवण्यासाठी नगर पंचायतीकडे पैसा आहे. परंतु नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी पैसा नाही. येत्या पंधरा दिवसात शहराला शुद्ध पाणीपुरवठा करून नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून दिला आहे. निवेदनावर नगर पंचायतचे विरोधी पक्षनेता तथा शिवसेना नगर सेवक सचिन हिरोळे, नगर सेविका अनिता कैलास झंवर, रविराज सुरडकर, सविता जवरे, रेखा सुरडकर, लिलाबाई पन्हाळकर, अनिता गोंड, सुनीता रत्नपारखी, सुलभा जवरे, शारदा जवरे, शोभा वराडे, प्रिती खर्चे, संध्या खंडागळे, वैशाली सुरडकर, वैशाली खर्चे, अर्चना फाटे, मिताली उन्हाळे, अरुणा हिवाळे, मालती खर्चे, प्रणिता सुरडकर, मनोरमा सातव, ललिता भारंबे, शकुंतला राठी, सुजाता चौघुले, जयश्री इंगळे यांच्यासह असंख्य महिलांच्या सह्या आहेत.
अन् मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात महिलांनी फोडल्या घागरी शहराला सातत्याने दुषित व अनियमित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी घागर मोर्चा काढून मुख्याधिकारी यांच्या दालनात घागरी फोडून आपला रोष व्यक्त केला आहे.
नगरपंचायतकडून पाणी समस्या दूर करण्याचे प्रयत्न ^शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोटार पंपात सातत्याने बिघाड होत असल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून मागील २५ एप्रिल रोजी झालेल्या मासिक सभेत नवीन मोटार पंपाला मंजुरी देण्यात आली आहे. त्याला प्रशासकीय मान्यता देखील मिळाली आहे. त्यामुळे लवकरच पाणीपुरवठ्याची अनियमितता दूर करून नागरिकांची कायमस्वरूपी पाण्याची समस्या दूर करण्याचे प्रयत्न नगर पंचायत प्रशासन करत आहे. -रवी पाटील, पाणीपुरवठा सभापती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.