आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभाग रचना:जानेफळ जि. प. सर्कलमध्ये फेरबदल; नव्या प्रभाग रचनेचा फायदा कोणाला?

जानेफळ25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने नव्याने काही जिल्हा परिषद मधील गावांमध्ये फेरबदल करण्यात आला आहे. त्यामध्ये जानेफळ सर्कल मध्येही फेरबदल झाला आहे. परंतु नव्याने झालेल्या प्रभाग रचनेचा फायदा कोणाला होणार आहे, हे आता पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जानेफळ जिल्हा परिषद सर्कलमध्ये या अगोदर जानेफळ व हिवरा खुर्द अशा दोन पंचायत समित्या होत्या पण आता नव्याने झालेल्या प्रभाग रचनेवर जानेफळ व लोणी गवळी अशा प्रकारची पंचायत समिती गण जोडल्या गेल्याने आता या जिल्हा परिषद सर्कल मध्ये नव्याने झालेल्या सहभाग रचनेमुळे आणखी चुरस वाढण्याची शक्यता आहे. कारण गेल्या दोन टर्म पासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या सर्कलवर काँग्रेसने मोठ्या प्रमाणात मुसंडी मारली आहे. तर देवानंद पवार या तरूण नेतृत्वाच्या रूपाने या मतदारसंघात विकासाच्या कामांना गती आली आहे. त्यामुळे देवानंद पवार यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असतांना मनीषा पवार यांच्या माध्यमातून जानेफळ सर्कल मध्ये अनेक गावांमध्ये स्मशानभूमी सौंदर्यीकरण, सिमेंट रस्ते, यासह विविध कामांना गती देऊन या सर्कलवर आपली पकड मजबूत केली आहे. तर दुसरीकडे चाणक्यनीती वापरून विरोधकांना चारी मुंड्या चीत करण्यात माहीर असलेले खासदार प्रतापराव जाधव हे सुद्धा या सर्कलवर विशेष लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची रणनीती काय असणार व कोणते धक्कातंत्र खासदार जाधव वापरतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच लोणी गवळी येथील मेहकर पंचायत समितीचे माजी सभापती सागर पाटील यांनीही शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून जिल्हा परिषदेसाठी आपली दावेदारी मजबूत केली आहे. एकंदरीत या सर्कल मध्ये नव्याने जोडलेली गावे सर्वच पक्ष कशाप्रकारे या गावांमध्ये जाऊन आपला संपर्क ठेवतात, हे सुद्धा महत्वाचे ठरणार आहे. आजही अनेक गावात समस्या भरपूर आहेत. या समस्यांसाठी जनतेला आता टोकाचे पाऊल उचलावे लागणार आहे. यासाठी मतदार राजा सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांना याबाबत विचारणा केल्याशिवाय राहणार नाही ही वस्तुस्थिती आहे. परंतु एकंदरीत सध्याची बदललेली परिस्थिती पाहता व प्रभाग रचनेमुळे या सर्कल मध्ये नव्याने जोडलेली गावे व या गावा पर्यंत पोहोचण्यास सर्व उमेदवारांना मात्र दमछाक करावी लागणार आहे. एकंदरीत नव्याने झालेल्या या जिल्हा परिषद सर्कल मधील बदलाने सर्वच पक्षातील भावी उमेदवारांना आता तारेवरची कसरत करावी लागणार आहे. जानेफळ जिल्हा परिषद सर्कल मध्ये खासदार प्रतापराव जाधव यांची चाणक्यनीती चालणार का देवानंद पवार यांच्या विकास कामाची गती वा आणखी काही वेगळे चित्र दिसणार हे भविष्य काळच सांगणार आहे.

बातम्या आणखी आहेत...