आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकशाहीची शिकवण:करवंड जि. प. शाळेत लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रिमंडळ स्थापन

चिखली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण पुरस्कार प्राप्त जि. प. मराठी उच्च प्राथमिक शाळा करवंड येथे नुकतीच लोकशाही पद्धतीने निवडणूक होऊन एकूण दहा विद्यार्थ्यांचे शालेय मंत्रिमंडळ अस्तित्वात आले. सर्वाधिक मते मिळालेल्या इयत्ता सातवीतील धनश्री गजानन लहाने हिला मुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली.

तिच्या समवेत गृहमंत्री शीतल जाधव, सूचना व प्रसारण मंत्री राजश्री भांड, शिक्षणमंत्री सृष्टी सुरडकर, आरोग्य मंत्री आरती गवारगुरू, सांस्कृतिक मंत्री कल्याणी खंडागळे, पर्यावरण मंत्री संस्कृती सपकाळ, शालेय स्वच्छता मंत्री वैष्णवी परखड, शालेय परिपाठ मंत्री कृष्णा परळकर तर क्रीडा मंत्री म्हणून निर्भय राठोडने पद व गोपनीयतेची शपथ घेतली. करवंड शाळेत सन २०१८-१९ ला पहिली व सन २०१९-२० ला दुसरी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक झाली होती. मधल्या काळात कोरोनामुळे निवडणूक झाली नाही. त्यामुळे यावर्षी उत्साहवर्धक वातावरणात निवडणूक पार पडली. सर्व विद्यार्थी मतदारांनी निवडणुकीत भाग घेतला व याचा थेट परिणाम निवडणुकीच्या टक्केवारीवर दिसून आला. शाळेतील रेड हाऊस व ग्रीन हाऊस या दोन्ही हाऊस मध्ये ही निवडणुकीची लढत झाली. दोन्ही हाऊसने प्रत्येकी दहा उमेदवार निवडणूक रिंगणात उभे केले होते.

महिलांना ५०% आरक्षण तत्त्वानुसार दोन्ही हाऊसने प्रत्येकी ६ मुलींना उमेदवारी दिली होती. तिकिट वाटप दोन्ही हाऊस प्रमुख व उपप्रमुखांनी केले. काही उमेदवारांना दोन्ही हाऊसने तिकिट नाकारल्यामुळे ते अपक्ष उभे राहिले. सुरूवातीला चार अपक्ष उमेदवार होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आणखी तीन विद्यार्थ्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे शेवटच्या दिवशी एकूण २१ उमेदवार १० जणांच्या मंत्रिमंडळाकरिता निवडणूक रिंगणात होते. उमेदवारी देण्याचे स्वातंत्र्य हाऊस प्रमुख व उपप्रमुखांना होते.

ग्रीन हाऊस प्रमुख पूनम घोंगते वर्ग ८ वा व उपप्रमुख विवेक इंगळे वर्ग ७ वा तसेच रेड हाऊस प्रमुख धनश्री राठोड वर्ग ८ वा व उपप्रमुख रोहण गायकवाड वर्ग ७ वा यांनी आपापल्या हाऊसचा जाहीरनामा प्रसिद्ध करून जोरदार प्रचार केला होता. त्यामुळे एकूणच उत्कंठावर्धक लढत होऊन धक्कादायक निकाल लागले. विजयी दहा उमेदवारात सहा मुली राहिल्या. ग्रीन हाऊसचे सहा उमेदवार तर रेड हाऊसचे चार उमेदवार विजयी झाले. शाळेच्या नियमानुसार सर्वाधिक मते मिळवलेली उमेदवार मुख्यमंत्री पदी विराजमान झाली. विरोधी पक्ष नेतेपदी इयत्ता सहावीतील विशाल पिवळ याची निवड करण्यात आली. बालपणातच विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची रूजवणूक व्हावी म्हणून दर महिन्याला मंत्रिमंडळाची आमसभा आयोजित केली जाणार आहे.

मंत्रिमंडळाला पद व गोपनीयतेची शपथ
नवनिर्वाचित मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाला मुख्याध्यापक विष्णू बाहेकर यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधी सोहळ्याचे प्रमुख अतिथी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश राठोड हे होते. सर्व उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित मंत्रिमंडळाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...