आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:खडकपूर्णा फेज दोनचे बुलडाण्यात काम सुरू; वाहतुकीचे मात्र वांदे

लक्ष्मीकांत बगाडे | बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा शहरात सध्या नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम सुरु आहे. १५७ किलोमीटरच्या या पाइपलाइनद्वारे मीटर बसवून शहराला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. खडकपूर्णा फेज २ ची ही योजना सुरु झाली आहे. फेज १ हा २०१२ मध्ये मंजूर झाला होता. त्यानुसार येळगावपर्यंत पाइपलाइनचे काम झाले होते. आता पालिकेच्या माध्यमातून शहरातील कामाला सुरुवात झाली आहे. काम सुरु असल्याने मात्र रहदारीचे रस्ते सध्या बंद झाले आहेत. हे खोदकाम किमान दहा दिवस तरी राहणार असल्याने नागरिकांनाही हा त्रास भविष्याचे दृष्टीने सहन करावा लागणार आहे. मात्र काही खोदकामांना जास्त दिवस होऊनही ते बुजवण्यात न आल्यानेही नागरिक त्रस्त झाले आहेत.

शहरात निर्माण होणारी पाणी टंचाई लक्षात घेता कायमस्वरुपी पाणी योजना खडकपूर्णा येथून करण्यासाठी २०१२ साली मंजुरी मिळाली होती. या योजनेला नंतर संथगती प्राप्त झाली होती. अखेर रखडत रखडत का होईना ही योजना येळगाव धरणावरील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचली. आता तिचा पुढचा टप्पा सुरू झाला आहे. ज्याचे काम सध्या सुरू असून गल्लोगल्ली आता खोदकाम होत आहे. सध्या काही भागात या कामाला सुरुवात झाली आहे. बसस्थानकामागे, तहसील कार्यालयाच्या रस्त्याने हे काम सुरू असून पाइपलाइन ही टाकणे सुरु झाले आहे.

बसस्थानकामागे तर जांभरुण रोड ते धाड रोडवरील पूर्णतः रहदारी वळवण्यात आली आहे. लोकांना रस्ता संपेपर्यंत यावे लागते तेव्हा कोठे कळते की रस्ता बंद आहे. बरेच दिवसांपासून हे काम सुरु आहे. खरंतर पावसाळ्यामुळे हे काम रखडले होते. ते आता पाऊस थांबल्यानंतर सुरु झाले आहे. मे महिन्यापर्यंत हे काम अजून चालणार आहे. दिवाळीच्या जवळपास मीटर पध्दतीने पाणी मिळण्यास सुरुवात होणार आहे.

स्वयंचलित जलशुद्धीकरण : या योजनेचे काम करताना खडकपूर्णा, पेनटाकळी प्रकल्पातील योजनेचे जुन्या पाइपचा वापर करण्यात आला आहे. त्याचा वापर करतांना पालिका ठेकेदाराला किती रक्कम कमी देते. याकडे शहर वासियांचे लक्ष लागले आहे. मात्र हे असतानाच नवीन योजनेत स्वयंचलित जलशुद्धीकरण केंद्र सुरु करण्यात येणार आहे. १३.८ लक्ष लिटरची पाण्याची टाकी राहणार आहे. नवीन जलशुद्धीकरण केंद्राद्वारे ६० दशलक्ष घनमीटर पाणी दररोज शुद्धीकरण होणार आहे.

मीटर सुरु झाल्यानंतर १३५ लिटर पाणी
सध्या दोन ते तीन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. लोकांना दरमाणसी १०० लिटर पाणी आता पुरवली जात आहे. नवीन पाइपलाइनचे काम झाल्यानंतर दरमाणसी १३५ लिटर पाणी पुरवठा होणार आहे. दररोज नळाला पाणी येणार आहे. सध्या २५ वर्ष जुनी पाइपलाइन टाकलेली आहे.

त्याद्वारे पाणी पुरवठा होत आहे. पाइपलाइन टाकणे ती टेस्टिंग करणे रिफाईनींग करणे असे नवीन पाइपलाइनचे काम सुरु आहे. १२ हजार नळ कनेक्शन सध्या असून नवीन जोडणीचे अर्ज सुध्दा पुढील काळात येऊ शकतील.

पाणी करात वाढ होण्याची शक्यता : पालिकेने दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी पाणीपट्टीत वाढ होत असते. सध्या वर्षाला एक हजार ९५० रुपये पाणी कर भरत असतो. मीटर सुरु झाल्यानंतर १००० लिटरचे एक युनिट प्रमाणे वार्षिक पाणीपट्टी लागणार आहे. जी आजच्या पाणी पट्टी एवढीच राहणार आहे. यामध्ये १५ टक्के वाढ होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...