आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

85 वर्षांची परंपरा:चिंता हरणारा लोणारचा ‘चिंतामणी’ गणेश ; वृक्ष लागवडीसह इतर सामाजिक उपक्रमांचे आजही पालन

लोणारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सराफ बाजारमधील श्री चिंतामणी गणेश पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. चिंता हरणारा चिंतामणी म्हणून ओळख असलेल्या गणेशाला ८५ वर्षांची परंपरा आहे.लोणार येथील सराफा बाजारामध्ये ८५ वर्षांपूर्वी पेठेतील डॉ. सावजी, कन्हैयालाल संचेती, मननुसेठ संचेती, पुरुषोत्तम गोविंद सोनिग्रा यासह प्रतिष्ठित नागरिकांनी चिंतामणी गणेशाची स्थापना केली. गणेशोत्सवाच्या काळात भक्तांची दर्शनाला मोठी गर्दी राहते. दरवर्षी गणेशोत्सव काळात या गणेश मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. यामध्ये वृक्ष लागवड करून पर्यावरण रक्षणाचा संदेशही या वेळी या मंडळाच्या सदस्यांनी दिला आहे. या गणेश मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आलेली पांढऱ्या मार्बलची मूर्ती राजस्थान वरून आणण्यात आली आहे. दरवर्षी मंदिरातील मूळ मूर्तीच्या बाजूला १० दिवसांसाठी पर्यायी मूर्तीची स्थापना मंडळाच्या सदस्यांकडून केली जात आहे. संकष्टी चतुर्थीला या गणेश मंदिरात मोठ्या श्रद्धेने भाविक पूजा अर्चना करण्यासाठी येतात. गणेश भक्तांकडून चिंतामणी गणेशाला विशेष अभिषेक ही या दहा दिवसांत केल्या जातो. गणेश भक्तांकडून नैवेद्य म्हणून विशिष्ट प्रकारचे मोदक प्रासादिक म्हणून वाटप केल्या जाते. चिंता हरणारा गणपती म्हणून त्यावर श्रद्धा आहे.

दहा दिवसांत सामाजिक उप्रकमांवर भर
कोरोना काळातही लोणार येथील चिंतामणी गणेश मंदिरात सामाजिक उपक्रम राबविले. निरंतर गणेश भक्तांची दर्शनासाठी उपस्थिती असते. यावर्षी निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात येत असल्याने गणेश मंडळाच्या वतीने उत्स्फूर्तपणे गणेशोत्सव साजरा केल्या जात आहे. या गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी गोर-गरिबांना अन्नदान करण्यात येते. गणेशोत्सवाच्या या दहा दिवसांत मंडळाच्या सदस्यांकडून सामाजिक उपक्रमांवर भर दिला जातो.

१९४० मध्ये मंदिराची स्थापना
चिंतामणी गणेश मंदिराचे संदीप संचेती, धन्नु सोनिग्रा, राम सावजी, श्याम सावजी हे कार्यकारी सदस्य आहेत. सन १९४० मध्ये या मंदिराची स्थापना डॉ. सावजी व त्यांच्या सहकार्याने केली होती. दरवर्षी श्री गणेशाची येथे स्थापना करण्यात येते. तर नीलकंठ चतुर्थीला भाविक भक्तांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येते.

बातम्या आणखी आहेत...