आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रासायनिक खत:पेरणीपूर्वी बियाण्यांच्या खरेदीसह होतेय रासायनिक खतासाठी शेतकऱ्यांची लूट ; डीएपीच्या खतांसोबत घ्यावे लागते केंद्र चालकाच्या मर्जीतील खत

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जून महिन्यात पेरणीची लगबग असल्याने कृषी केंद्राकडे शेतकऱ्यांची धाव असते. बियाणे खरेदीसह रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांची लूट केली जाते. असा प्रकार उजेडात आला असला तरी डीएपी खतासोबत स्वनिर्मित खते ही जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे शेतकरी लुबाडला जात आहे. हा कृषी केंद्र चालकांचा धंदा बंद करण्यासाठी कृषी विभागाकडे पथक असले तरी एखादा फंटर पाठवून कृषी केंद्रावर धाड टाकण्याची कारवाईची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. सध्यातरी जिल्ह्यात रासायनिक खतांचा मुबलक साठा आहे. सर्व खतांचा मिळून ८१ हजार ८२९ मेट्रिक टन इतका शिल्लक साठा असून डीएपी सध्या १३८५२ मेट्रिक टन इतके उपलब्ध आहे. असे असताना शेतकऱ्यांची लुबाडणूक होणे अपेक्षित नाही. जिल्ह्यात जवळपास सात लाख हेक्टरवर यंदा खरिपाची पेरणी होण्याचा अंदाज आहे. मात्र पावसाचा अंदाज बघितल्यावर किती शेतकरी पेरणी करतात, हे सांगणे शक्य नाही. परंतु खरिपाच्या पेरणीसाठी पुरेसे बियाणे कृषी केंद्रावर उपलब्ध आहे. तर रासायनिक खते ही उपलब्ध आहेत. सर्व प्रकारचे खते मिळून एक लाख ७७ हजार ५६२ मेट्रिक टन खते मंजूर आहे. त्यातील ९०५५७ मेट्रिक टन साठा जून अखेर उपलब्ध होणार आहे. तर ५५००५ मेट्रिक टन साठा सध्या उपलब्ध आहे. असा एकूण ९८४६४ इतका साठा सध्या उपलब्ध आहे. खते विक्रेते यांच्याकडे १६६३५ मेट्रिक टन साठा विक्री करता उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या खतांची टंचाई जाणवणार नाही. खतांची मागणी पाऊस पडल्यानंतर कितपत वाढते हे लवकरच कळणार आहे. खते विक्री करताना मात्र डीएपी खतांसोबत आपल्याच कंपनीचे खत घेण्याचे दडपण कृषी केंद्र चालक आणत आहेत. एक दुकानदार नुकताच पकडण्यात आला असला तरी अजूनही बुलडाण्यात काही मोठे दुकानदार १२०० रुपये शिल्लकचे घेत असल्याच्या तक्रारी आहेत.

लूट थांबवण्यासाठी पथक तयार करा आपल्या जिल्ह्यात खतासोबत अन्य लिक्विड इतर खते देत आहेत. यावर नियंत्रणासाठी आपल्या अध्यक्षतेखाली पथक तयार करण्यात यावे. अशी मागणी भारतीय किसान मोर्चाचे वतीने जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे. निवेदनावर किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस चक्रधर लांडे, दत्ता पाटील, डिगांबर जाधव, श्रीराम जाधव, उद्धव पवार, सुभाष जगताप आदींच्या सह्या आहेत.

जिल्ह्यात असे आहेत केंद्र बुलडाणा तालुका २०७, चिखली तालुका २२०, मोताळा तालुका ११६, मलकापूर तालुका १०६, मेहकर तालुका २११, लोणार तालुका १३२, सिंदखेड राजा तालुका १७०, देऊळगाव राजा तालुका १६९, खामगाव तालुका १६१, शेगाव तालुका ७९, संग्रामपूर तालुका ८५, जळगाव जामोद तालुका ११३, नांदुरा तालुका १११ अशी कृषी केंद्र व साठवणूक केंद्र आहेत. यातील ४० टक्के केंद्र बंद आहेत. या सर्व केंद्राची तपासणी तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्या मार्फत करण्यात येत आहे.

ब्लॉगवर मिळेल खतांची दुकाननिहाय माहिती ^जिल्हयात खतसाठा मुबलक प्रमाणात आहे. खताची निर्मिती करण्याचे प्रात्यक्षिकही दाखवले जाते. खतांची टंचाई वगैरे काही नाही. शेतकऱ्यांना दुकानदार खतांबाबत योग्य मार्गदर्शन करत नसतील तर कृषी सेवा केंद्रावर उपलब्ध साठ्याबाबतची माहिती https://adozpbuldana.blogspot.com/2022/04/blog.post.html या ब्लॉगवर उपलब्ध आहे. -अनिसा महाबळे जिल्हा कृषी विकास अधिकारी, बुलडाणा

परवाना निलंबनाची कारवाई करावी ^पेरणी आली म्हणजे शेतकरी कृषी केंद्राकडे जातात. नेमक्या याच संधीचा फायदा घेत काही कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांची अडवणूक करतात. बुलडाणा येथील सागर कृषी केंद्राची तक्रार अजय शेवाळे यांनी दिली होती. यावरुन संबधित कृषी केंद्राचा परवाना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी निलंबित केला आहे. तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी पुढे यावे. अन्यथा कृषी विभागाने डमी ग्राहक पाठवून कारवाई करावी. -संदीप गायकवाड, बुलडाणा

बातम्या आणखी आहेत...