आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंताजनक:संग्रामपूर तालुक्यातील जनावरांना लम्पीची लागण; सावळ्यात बैलाचा मृत्यू

संग्रामपूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पातुर्डा, वानखेड, वरवट बकाल, पंचाळा, चांगेफळ, सावळा यासह इतर गावातील जनावरांमध्ये लम्पी सदृष्य आजाराचा प्रादुर्भाव आढळून आल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणी अंती उघडकीस आले आहे. तर सावळा येथील पशुपालक गोपाल गावंडे यांच्या बैलाचा या आजाराने मृत्यू झाल्याची माहिती पशू पालकाने दिली आहे. तसेच चांगेफळ खुर्द येथील श्रीराम खिरोडकर व सावळा येथील हरिदास ताठोड यांच्या जनावरांना तर पातुर्डा, वानखेड, वरवट बकालसह इतर गावात लम्पी सदृष्य आजाराची जनावरे आढळून आली असून या जनावरांवर पशू वैद्यकीय विभागाकडून औषधोपचार करण्यात येत आहेत. पशुपालकांनी आपल्या जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

उष्ण व दमट वातावरणामुळे गाय वर्गीय जनावरांवर लम्पी स्कीन या रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. इतर जिल्ह्यात आढळणारा लम्पी स्कीन हा आजार संग्रामपूर तालुक्यातील ग्रामीण भागातही डोके वर काढत असल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जनावरांचे संरक्षण व्हावे, यासाठी त्वरित पशुवैद्यकाकडून उपचार करून घेणे गरजेचे आहे. हा आजार पोक्सविरिडी या विषाणूच्या जातीमधील कप्रीपोक्स या विषाणूमुळे गाय, बैल, व वासरांना होतो.

हा आजार संसर्गजन्य आजार असल्यामुळे हा आजार एका जनावरापासून दुसऱ्या जनावरांना चावणाऱ्या डास, गोचीड, गोमाशा यांच्याद्वारे तसेच आजारी जनावरांच्या खाद्य, पाणी, भांडे यांच्या संपर्कामुळे होतो. या आजारामुळे जनावरांचा मृत्यू दर कमी असला तरी रोगग्रस्त जनावरे अशक्त होतात. जनावरांची रोग प्रतिकार शक्ती कमकुवत होऊन दुधाळ जनावरांचे दुध उत्पादनही कमी होते. तसेच गर्भपात होऊन जनावरांची प्रजनन क्षमता घटते. या आजारामुळे जनावरांची त्वचा खराब होऊन जनावरे विकृत दिसतात. पातुर्डा, वानखेड, वरवट बकाल, चांगेफळ खुर्द, सावळा आदी गावात या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहेत. त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या आजाराची अशी आहेत लक्षणे
लम्पी स्कीन या आजारात जनावरांना दोन ते तीन दिवस मध्यम तीव्रतेचा ताप येतो. शरीरावर कडक, घट्ट गोलाकार फोड येतात. या फोडाच्या कडा घट्ट व वर आलेल्या दिसतात. काही कालावधीनंतर हे फोड काळे पडून त्यावर खपली तयार होते. ही खपली निघाल्यानंतर गोल खड्डा होतो. त्यामुळे आतील गुलाबी त्वचा दिसू लागते. जनावरांचे वजन कमी होते. अशक्तपणा, चारा खाणे कमी होते. लसीका ग्रंथी, पाय व पोळ यावर सूज येते. दुधाळ जनावरांची दूध उत्पादन क्षमता कमी होते. गाभळणे, वंध्यत्व येणे अशी लक्षणे या आजारात दिसतात, अशी माहिती पशू वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

आजारी जनावरांवर तातडीने उपचार करावा
या आजारामुळे जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी हा रोग संसर्गजन्य आहे. त्यामुळे दिवसागणिक या आजाराच्या जनावरांच्या संख्येत वाढ होते आहे. या आजाराला आळा घालण्यासाठी पशू मालकांनी आजारी जनावरे कळपातून वेगळी करावी. आजारी जनावरांना चरण्यासाठी पाठवू नये, त्यांचा चारा, पाणी वेगळा करावा. बाह्य परजीवांचा डास, गोचीड,गोमाशा, माशा याचा बंदोबस्त करावा. तसेच लम्पी सदृष्य व लक्षणे असलेल्या जनावरांना खाद्यामध्ये मऊ, पातळ, रसदार चारा द्यावा. खाद्यासोबत खनिज मिश्रण, व्हिटॅमिन्स द्यावे.
डॉ. जगताप, पशुवैद्यकीय अधिकारी

बातम्या आणखी आहेत...