आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुःखद:शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला शोक

येथील प्रख्यात श्री संत गजानन महाराज संस्थान चे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे आज रोजी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता दुःखद निधन झाले असल्याची अधिकृत माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. श्री संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त असलेले शिवशंकर भाऊ पाटील यांच्यावर गेल्या अनेक दिवसापासून उपचार सुरु होते. ३ ऑगस्ट रोजी त्यांची प्रकृती गंभीर झाल्यावर शेगाव येथील प्रख्यात ह्रदयरोग तज्ञ डॉ. हरीश सराफ व बुलडणा येथील प्रख्यात आयुर्वेदिक तज्ञ डॉ. गजानन पडघान हे त्यांच्या प्रकृती कडे लक्ष ठेवून होते. दरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिवशंकर सुखदेव गणेश पाटील यांचा जन्म १२ जानेवारी १९४० रोजी झाला. ३१ ऑगस्ट १९६२ पासून शिवशंकरभाऊ पाटील हे श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त बनले. १९६९ ते १९९० पर्यंत असे सतत वीस वर्षे श्री संत गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले आहेत. सद्य परिस्थितीमध्ये शिवशंकरभाऊ पाटील हे श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव चे व्यवस्थापकीय विश्‍वस्त म्हणून कार्यरत होते. शेगाव नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून १९७४ ते १९७९ पर्यंत सतत पाच वर्षे त्यांनी कार्य पाहिले. श्री गजानन शिक्षण संस्था स्थापन करून त्या माध्यमातून शिवशंकरभाऊ पाटील यांनी गाव आणि परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना इंजिनियर बनवून केवळ भारतातीलच नव्हे तर परराष्ट्र मध्ये सुद्धा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये उच्च पदापर्यंत पोहोचविले. भाऊंनी शेगाव येथे श्री संत गजानन महाराज इंजिनिअर कॉलेज स्थापन शेगाव नगरीला जागतिक स्तरावर स्थान मिळवून दिले. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झालेले होते. शिवशंकर भाऊ यांच्या परिवारात पत्नी दोन मुलं श्री संत गजानन महाराज संस्थानचे कार्यकारी विश्वस्त नीलकंठदादा पाटील व श्री संत गजानन महाराज इंजिनिअर कॉलेज चे कार्यकारी संचालक श्रीकांत दादा पाटील ,तीन विवाहित मुली ,नातवंड असा मोठा आप्तपरिवार आहे.

शिवशंकरभाऊ पाटील यांचे वय ८२ वर्ष होते शिव शंकर भाऊ पाटील यांनी आयुष्यभर आयुर्वेदिक उपचार यालाच प्राधान्य दिल्यामुळे त्यांच्यावर घरीच डॉक्टर सराफ यांच्या मार्गदर्शनात पूर्ण मेडिकल ट्रीटमेंट त्यांच्यावर सुरू होते कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांनी श्री संत गजानन महाराज संस्थान च्या माध्यमातून शेगाव शहरासह संपूर्ण महाराष्ट्रभरअनेक जणोपयोगी उपक्रम राबविले आहेत. कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांनी अध्यात्मिक व सामाजिक कार्याची सांगड घालून नवा आदर्श समाजासमोर निर्माण केलेला आहे मंदिर व्यवस्थापनाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव..होय. या मंदिर व्यवस्थापनाचे संचालन करण्याची जबाबदारी शिवशंकरभाऊ पाटील यांच्याकडे वयाच्या अठराव्या वर्षी श्रींच्या आज्ञेने आली. तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांनी स्वतःला या सेवाकार्यात अखंडपणे वाहून घेतले संस्थानच्या माध्यमातून विविध सेवाकार्य चालविणारे श्री संत गजानन महाराज संस्थान श्रद्धा ,विश्वास,आणी भक्ति ही त्रिसूत्री पक्की करून भाऊसाहेब शिवशंकर भाऊ कार्यरत होते त्यांच्या अंत्यसंस्काराची सहभागी होण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा नगराध्यक्ष शकुंतला बूच यांच्यासह श्री संत गजानन महाराज संस्थान चे सर्व विश्वस्त श्री गजानन शिक्षण संस्थेचे सर्व संचालक व भाविक प्रतिष्टीत नागरिक सहभागी झाले होते.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
श्रद्धा आणि कर्मयोगाचे मूर्तीमंत रुप काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजलीही अर्पण केली आहे. मुख्यमंत्री शोक संदेशात म्हणतात, श्री. संत गजानन महाराज यांच्या ज्ञान, भक्ती आणि कर्माच्या त्रिवेणी शिकवणीवर नितांत श्रद्धा ठेवून शिवशंकरभाऊ जगले. त्यांनी आपल्या कर्मयोगातून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही संस्थांची बांधणी केली. त्याद्वारे गोरगरिब आणि वंचिताची सेवाही केली. त्यांच्या निस्वार्थतेचे दाखले हे दंतकथा वाटतील अशा पण सत्य आहेत. श्री. गजानन महाराज संस्थानाची कारभाराचे नियोजन, व्यवस्थापन हा जगभरातील तज्ज्ञांसाठी अभ्यासाचा विषय राहीला आहे. त्यांच्या निधनाने सेवा कार्यासाठी आयुष्य वेचलेला कर्मयोगी काळाने हिरावून नेला आहे.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले...
श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगावचे प्रमुख श्री शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक व्रतस्थ सेवेकरी, मॅनेजमेंट गुरू, निष्काम कर्मयोगी आपण गमावला आहे. शिवशंकर भाऊ हे समर्पण भावाचे मूर्तिमंत होते. शेगावला जायचो तेव्हा अनेकदा त्यांची भेट व्हायची. प्रत्येकवेळी आपुलकीने विचारपूस करायचे, शेगाव संस्थानचे प्रश्न सोडवून घ्यायचे. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्याला हातभार लावण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य होते. महाजनादेश यात्रेप्रसंगी सुद्धा शेगावला दर्शनाला गेलो, तेव्हा त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा झाल्या होत्या. त्यांच्या निधनाने मी व्यक्तिगत मार्गदर्शकाला मुकलो आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

विवेकानंद केंद्र परिवाराने व्यक्त केले दुःख
'शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानचे कार्यकारी व्यवस्थापक शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनामुळे विवेकानंद केंद्र परिवाराने एक आत्मज गमावला आहे ', अशी प्रतिक्रिया केंद्राचे महासचिव भानुदासजी यांनी व्यक्त केली आहे.शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांचे आज निधन झाले, त्यानंतर विवेकानंद केंद्राने या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

'शिवशंकरभाऊ हे शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानचे कार्यकारी व्यवस्थापक होतेच, परंतु ते एक सच्चे विवेकानंद भक्त, निष्काम कर्मयोगी, पारदर्शी आर्थिक व्यवहार जगणारे विनम्र विश्वस्त होते. आपल्या अबोल कृतीतून त्यांनी विवेकानंद केंद्र कार्यकर्त्यांनाच नव्हे तर गजानन महाराज संस्थानच्या कोट्यवधी साधकांना, सेवकांना व भक्तांना खूप काही शिकवले ', अशी प्रतिक्रिया भानुदासजी यांनी व्यक्त केली आहे.

2013 साली स्वामी विवेकानंद यांच्या जन्माला 150 वर्ष पूर्ण झाली तेव्हा स्थापन झालेल्या स्वामी विवेकानंद सार्ध शती महोत्सव समितीचे ते महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष होते. विवेकानंद केंद्राचे अनेक मोठे व महत्वाचे कार्यक्रम त्याकाळात शेगाव संस्थानामध्ये पार पडले. भाऊ त्या कार्यक्रमांना उपस्थित असत, परंतु संस्थानामधल्या चहाच्या कपालाच काय, लवंग-वेलदोड्यालाही भाऊ स्पर्श करीत नसत, हे अनेकांना स्पर्शून जात असे अशी आठवण सार्ध शती महोत्सव समितीचे तत्कालीन सचिव सुधीर जोगळेकर यांनी व्यक्त केली.

विश्वस्त या संकल्पनेला सर्वार्थाने जागणारा, संस्थानसाठी कोट्यवधी रूपयांच्या देणग्या मिळत असतानाही, जेवढ्या रकमेचा विनियोग करणे संस्थानला शक्य आहे, व जेवढ्याची गरज आहे तेवढीच रक्कम स्वीकारणारा, संस्थानच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांचा ताळेबंद पूर्ण झाल्यानंतरच घरी परत जाणारा असा विश्वस्त होणे नाही, अशी प्रतिक्रियाविवेकानंद केंद्राचे महाराष्ट्र प्रांत प्रमुख अभय बापट यांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादीचे मंत्री शिंगणे यांनी व्यक्त केले दुःख
शेगाव संस्थानचे प्रमुख आदरणीय शिवशंकरभाऊ पाटील यांचे आज 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30 वाजता अल्पशा आजाराने दुःख निधन झाले. अतिशय दुःखद व वेदनादायी अशी ही बातमी आहे. आदरणीय शिवशंकरभाऊनी संत गजानन महाराजांचे कार्य जगभर पोहजविले. मागील अनेक वर्षांपासून संस्थानच्या माध्यमातून महाराष्ट्रात व मध्यप्रदेश मध्ये महाराजांचे मंदिर उभारणीचे काम त्यांनी केले. संस्थानचे काम अतिशय पारदर्शक व स्वछ ठेवले. संस्थांच्या माध्यमातून अनेक शाळा व उच्चशिक्षण संस्था निर्माण केल्यात. आनंद सागर सारखे भव्य दिव्य पर्यटन स्थळ निर्माण केले. संत गजानन महाराज यांना अपेक्षित असलेले गोर गरिबांचे कल्याण व सेवा करण्याचे काम भाऊंनी आयुष्यभर अतिशय प्रामाणिकपणे केले. प्रामाणिकपणे व सचोटीने प्रत्येक पैशाचा हिशोब भाऊंनी ठेवला. जेव्हा जेव्हा काही नैसर्गिक संकटं आली त्यावेळी संस्थांच्या माध्यमातून भाऊंनी मदत तात्काळ मदत केली. कोरोना काळात देखील जिल्ह्याला मोठा आधार संस्थेच्या माध्यमातून मिळाला आहे. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्यासोबत त्यांचे शेवटपर्यंत ऋणानुबंध होते. आज शेगावला जो दर्जा प्राप्त झाला आहे त्याचे संपूर्ण श्रेय आदरणीय भाऊंना जाते. त्यांच्या जाण्याने खरे गजानन भक्त हरवले आहेत. मी जिल्हयाचा पालकमंत्री या नात्याने संपूर्ण जिल्ह्याच्यावतीने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने तसेच माझ्या शिंगणे परिवाराच्या वतीने आदरणीय भाऊंना श्रद्धांजली अर्पण करतो.

बातम्या आणखी आहेत...