आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आघाडी:सर्वाधिक जागांवर विजयी झाल्याचा महाविकास आघाडीकडून दावा

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील २७९ ग्रामपंचायतींपैकी २५१ ग्राम पंचायतींच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी लागल्यानंतर कोठे गुलाल उधळला गेला तर कोठे नाराजीचा सूर आळवत कोठे कमी पडलो याचे गणित जुळवण्यात आले. निवडणुका शांततेत पार पडल्या तरी मतमोजणीनंतर थोडे नरम थोडे गरम वातावरण होते. काहींचा पुनर्मतमोजणीचा आग्रह होता. पक्षानी विजयाचे दावे केले आहेत.

सिंदखेड राजा तालुक्यातील ३० ग्रा.पं.ची निवडणूक होती. एक ग्रा.पं. व सरपंच बिनविरोध निवडून आले. त्यामुळे २९ ग्रा. पं.चा व सरपंचपदाचा निकाल लागला. देऊळगाव राजा तालुक्यातील १९ पैकी १७ चा निकाल लागला. शिंदखेड राजा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीने बाजी मारली. बुलडाणा तालुक्यात १२पैकी दोनमध्ये हतेडी व ढालसावंगी बिनविरोध असल्याने १० साठी मतमोजणी झाली. तालुक्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाल्याचा दावा आहे. सुंदरखेडच्या सरपंचपदाची निवड अटीतटीची झाली. जळगाव जामोद तालुक्यातील १९ ग्रा.पं.साठी मतमोजणी झाली. ११ जागांवर राष्ट्रवादीने तर काँग्रेस व उद्धव ठाकरे गटाने एक जागा जिंकल्याचा दावा केला. चिखली तालुक्यातील २८ पैकी २३ साठी मतमोजणी झाली.

मेहकर तालुक्यातील ५० पैकी ४७ ग्रा.पं.ची मतमोजणी झाली. बहुतांश ठिकाणी शिंदे गटाने वर्चस्वाचा दावा केला. लोणार तालुक्यात ३९ पैकी ३८ ग्रा.पं.ची मतमोजणी झाली. महाविकास आघाडी व शिंदे गटाला यश मिळाल्याचा दावा आहे. खामगाव तालुक्यात १६ ग्रा.पं.साठी मतमोजणी झाली. शेगाव तालुक्यातील १० ग्रा.पं.साठी मतमोजणी झाली. संग्रामपूर तालुक्यात महाविकास आघाडी व भाजपला यश मिळाले. नांदुरा तालुक्यातील १३ ग्रा.पं. व मलकापूर तालुक्यातील ११ पैकी १० ग्रा.पं.मध्येही संमिश्र यश मिळाले. मोताळा तालुक्यात काँग्रेसची सरशी झाली आहे. त्यानंतर शिंदे गटाला यश मिळाले आहे. भाजपला एकही जागा मिळाली नाही.

प्रत्येक पक्षाने केला विजयाचा दावा
जिल्ह्यातील २७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सर्वाधिक ग्रामपंचायती आपल्याच पक्षाच्या असल्याचे दावे केले जात आहेत. तर काही ठिकाणी स्वबळावर निवडणूक जिंकणारेही सरपंच आल्याने दावे-प्रतिदावे कुठपर्यंत योग्य आहेत. हे सांगता येणे कठीण आहे. विशेष म्हणजे सरंपचपदाची निवडणूक कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर न झाल्याने आज कोण कोणत्या पक्षाचा दावा करत असला तरी नंतर कोणत्या पक्षाशी, नेत्यांशी जोडले जाईल. हे सांगणे कठीण आहे.

बातम्या आणखी आहेत...