आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाणा:भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांनंतर मलकापूर अर्बन बँकेत ग्राहकांची गर्दी, फक्त 10 हजार रुपये काढण्याची मुभा

बुलडाणा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभर विस्तारलेल्या मलकापूर अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लावले आहेत. हे आदेश जारी होताच २५ नोव्हेंबरला ग्राहकांची बँकेत गर्दी केली. आता खातेधारकाला खात्यातून फक्त दहा हजार रुपये काढता येणार आहेत. एक हजार कोटींच्या ठेवी व २८ शाखा असलेल्या या बँकेवर निर्बंध आल्याने खातेदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ग्राहकांना १० हजार रुपये काढता येणार असले तरी ते रोज काढता येतील की तो कालावधी किती असेल याबाबत संभ्रम आहे.

भाजप नेते तथा मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेती मलकापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष आहेत. यापूर्वी बँकेला केवायसीसंदर्भात २ लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. बँकेचा उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विस्तार आहे. २००८ मध्येही बँकेच्या कारभारावर आरोप झाले होते. आता एनपीए वाढणे, लेखापरीक्षणात त्रुटी तसेच कामकाजात अनियमितता असल्याचा ठपका रिझर्व्ह बँकेने ठेवला आहे. याबाबत बँकेने अद्याप काही खुलासा केलेला नाही.

रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांनुसार, खातेदारांना १० हजार रुपयेच काढता येतील.
नवीन मालमत्ता विक्रीवर बंदी असून कर्जाचे नूतनीकरण करता येणार नाही. सर्व बचत खाती, चालू खाती ठेवीदारांच्या इतर कोणत्याही खात्यातील शिल्लक रकमेच्या १० हजारांपर्यंतची रक्कम काढण्यास परवानगी दिली जाऊ शकते. सहा महिने हे निर्बंध असतील.

बँकेच्या खातेदार व्यापाऱ्यांच्याही व्यवहारांवर परिणाम
बुधवारी दिवसभर बँकेचे व्यवहार सुरळीत होते. कामकाज आटोपल्यानंतर रिझर्व्ह बँकेचे आदेश आले. या बँकेत सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांची चालू खाती आहेत. बाजार समितीत शेतकऱ्यांकडून शेतीमाल विकत घेतल्यानंतर व्यापारी याच बँकेचे धनादेश शेतकऱ्यांना देत असतात. यामुळे आता शेतकऱ्यांनाही अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. शेतकऱ्यांना जरी दुसऱ्या बँकेचे धनादेश बदलून दिले तरी या बँकेच्या खात्यात पैसे असल्याने व्यापाऱ्यांनाही त्रासदायक होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...