आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध धंदे जोमात:मेहकर शहर अवैध ऑनलाइन चक्रीच्या विळख्यात, पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष

मेहकर / संतोष मलोसे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही दिवसांपासून शहरात खुलेआमपणे अवैध धंदे सुरू आहेत. अवैध ऑनलाइन चक्रीने तर धुमाकुळ घातला आहे. या अवैध धंद्याकडे पोलिस प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्यामुळे शहराची शांतता व सुव्यवस्था धोक्यात सापडली आहे. यावरही कळस म्हणजे पोलिस स्टेशन तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरच मटका, जुगारासारखे अवैध धंदे सुरू आहेत. त्यामुळे शहराची शांतता टिकून ठेवण्यासाठी शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांना आळा घालण्यात यावा, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.

येथील पालिका प्रशासनाने २०१६ मध्ये १ कोटी २० लाख रुपये खर्च करून भाजीपाला मार्केट बांधले. परंतु या भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाला न मिळता हे मार्केट अवैध ऑनलाइन चक्री, वरली मटक्याचा अड्डा बनला आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. परंतु या अवैध धंद्यांमुळे या उत्सवासाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी बाजारात महिलांना फिरणे देखील मुश्किल झाले आहे. भाजी मार्केटमध्ये भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेलेल्या प्रत्येकाला अवैध धंदेवाले वरली मटक्याच्या चिठ्ठ्या फाडताना दिसून येतात. तसेच खुलेआम ऑनलाइन चक्रीची दुकाने सुरू आहेत. तरीसुद्धा पोलिस प्रशासन या अवैध धंद्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. अवैध धंद्यावर स्थानिक पोलिस कारवाई करत नसतील तर शहरात उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे सुद्धा कार्यालय आहे. परंतु ते सुद्धा कुठलीच कारवाई करत नसल्याने अवैध धंदेवाल्यांना धाक तरी कोणाचा असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. अवैध धंदेवाल्यांचे मनोबल एवढे वाढले, की शहरातील प्रत्येक चौकांत ऑनलाइन चक्री, वरली मटका, वरलीच्या चिठ्ठ्या फाडणारे खुलेआम बसलेले दिसतात.

सामान्य नागरिकांचा पोलिस प्रशासनावरील विश्वास उडाला
शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्याचा त्रास बाजार पेठेतील दुकानदारांना होत आहे. या अवैध धंद्यांमुळे ग्राहक दुकानापर्यंत येत नाही. पालिका प्रशासन देखील अवैध धंद्याकडे लक्ष देत नाही. पोलिस अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. भाजीपाला मार्केटच्या ठिकाणी वरली मटका सुरू आहे. बाजारात ग्राहक फिरकत नसल्याचे येथील दुकानदारांनी सांगितले आहे.

पोलिस प्रशासनाचे माैन
शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत ठाणेदारासह वरिष्ठ अधिकाऱ्यास विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे स्थानिक पोलिस प्रशासन चुप्पीची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...