आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापावसाळ्याच्या दिवसांत जनावरांना घटसर्प, फऱ्या, तोंडखुरी, रक्ताची हागवन यासह इतर आजारांची लागण होऊ नये, यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दरवर्षी मान्सूनपूर्व जनावरांचे लसीकरण करण्यात येते. परंतु पावसाळा सुरू होऊन वीस दिवसांचा कालावधी उलटून गेला असताना देखील १६ मे पर्यंत जिल्ह्यात केवळ २ लाख २९ हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. अद्यापही लसीकरण सुरू असल्यामुळे लसीकरण झालेल्या जनावरांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. लसीकरणाची स्थिती पाहता व मुक्या जनावरांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाची गती वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.
वेळेवर उपचार न मिळाल्यास या आजाराने जनावरांचा मृत्यू देखील होतो. त्यामुळे जनावरांना उपरोक्त आजारांची लागण होऊ नये व त्यांचा नाहक बळी जाऊ नये, यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दरवर्षी मान्सून पूर्व लसीकरण अभियान राबवण्यात येते. यावर्षी या अभियानास उशिरा सुरूवात करण्यात आली.
मागील १६ मे पर्यत जिल्ह्यातील नाममात्र २ लाख २९ हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यात १० लाख ९० हजारांच्या आसपास जनावरांची संख्या आहे. त्यामुळे लसीकरणाची उपरोक्त आकडेवारी पाहता अद्यापही सात लाख जनावरे लसीकरणापासून वंचित असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. आतापर्यंत लसींचा तुटवडा असल्याने लसीकरण झाले नव्हते. अजूनही लसीकरण मोहीम सुरू असल्यामुळे लसीकरण झालेल्या जनावरांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
पाच लाखांहून अधिक लसीचा पुरवठा
जनावरांच्या विविध आजारासाठी जिल्ह्याला पाच लाखांहून अधिक लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामध्ये घटसर्पासाठी १ लाख १२ हजार, फऱ्या ९४ हजार ५००, रक्ताची हगवण १ लाख ५ हजार, देवी ८५ हजार, व आतड्याच्या आजारासाठी ८३ हजार लसीचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
पावसाळ्यात जनावरांना विविध आजार होत असल्याने लसीकरण करून घ्यावे दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांत जनावरांना विविध प्रकारचे आजार जडतात. परंतु या आजारासाठी शासनाने लसी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे पशू पालकांनी आपल्या जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पशू संवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील जनावरांची संख्या
जिल्ह्यात लहान-मोठ्या जनावरांची संख्या १० लाख ९० हजार ८९७ एवढी आहे. त्यामध्ये ४ लाख ६१ हजार ५२९ गाई व १ लाख ३४ हजार १४८ म्हशी तर उर्वरीत इतर जनावरांचा समावेश आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.