आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचिखली, बुलडाणा तालुक्यात खरीप हंगामातील जूनच्या अखेरीस व सप्टेंबरमध्ये परतीच्या संततधार आणि मुसळधार पावसाने शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पीक आणेवारी ५० पैशाच्या आत आलेली आहे. त्यामुळे मदतीपासून वंचित ठेवलेल्या चिखली मतदार संघातील शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी आमदार श्वेता महाले यांनी २२ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चेदरम्यान केली.
मागील वर्षी जून महिन्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस पडला. या पावसाने आमखेड व अंबाशी येथील तीस वर्षांपूर्वीचे तलाव फुटल्याने तलावाखालील जमिनी खरडून गेल्या. अशीच परिस्थिती उंद्री, अमडापूर मंडळातील अनेक गावामध्ये निर्माण झाली होती. चिखली आणि बुलडाणा तालुक्यात २८,२९ सप्टेंबर २०२१ रोजी संततधार पाऊस पडून अतिवृष्टीमुळे पैनगंगेचे उगमस्थान असलेल्या आणि येळगाव धरणाच्या कचमेन्ट मधील पाडळी महसूल मंडळात १२६ मिलिमीटर पाऊस पडल्याने येळगाव धरण ओव्हरफ्लो होऊन धरणाचे ८० स्वयंचलित दरवाजे एकत्र उघडल्याने धरणाखालील पैनगंगा नदीला पूर येऊन येळगाव, सव, खूपगाव, किन्होळा, वाडी ब्रम्हपुरी, सवणा, सोमठाणा, दिवठाणा, पेठ, उत्रादा, बोरगाव काकडे व कोलारी, सवणा, उत्रादा, दिवठाणा, पांढरदेव, देवधरी व इतर नदीकाठच्या गावांना पुराचा वेढा पडून सगळीकडे जलमय झाले. तसेच चिखली विधानसभा मतदारसंघातील बुलडाणा तालुक्यातील साखळी महसुली मंडळात ८० मिलिमीटर पाऊस होऊन साखळी, शिरपूर, पिंपळगाव सराई, पांगरी, केसापूर, अंत्री तेली, कोलारी ही गावे बाधित झाली होती. चिखली तालुक्यातील ८९००० हेक्टर क्षेत्रापैकी केवळ २५५० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचेच नुकसान झाल्याचे दाखवून केवळ नदीकाठच्या ४५०० शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवण्यात आले होते. याचाच अर्थ तालुक्यातील ७०,००० शेतकरी मदती पासून वंचित असून ८६,४५० हेक्टर वरील पिके मदती पासून वंचित आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत देऊ करावी, अशी मागणी आमदार श्वेता महाले यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.