आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासततच्या पावसामुळे जिल्ह्यात ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सद्यःस्थितीत खरिपाचे जिल्ह्यातील ४० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाले असून, नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे मूग, उडीद हातचे गेले आहे. तर सोयाबीनच्या अनेक शेतात पाणी तुंबल्याने ते पूर्णपणे जळाले आहे. अनेक शेतात सतत पाणी साचत असल्याने पिके पिवळी पडली अाहेत. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट येणार आहे. शासनाने जिल्ह्यातील खरिपाचे नुकसान पाहता ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
खरीप पिकाची पेरणी जून महिन्यात पूर्ण होते. यामध्ये सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, मका व इतर खरीप हंगामामध्ये येणाऱ्या पिकांची लागवड केली जाते. दरवर्षी जून व जुलै महिन्यात खरीप पिकायोग्य पाऊस पडत असल्यामुळे शेतातील पीकही बहरलेले असते. परंतु या वर्षी जून महिन्याच्या शेवटी व पूर्ण जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे पेरणी केलेले सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांचे ४० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाले आहे. तर मूग व उडीद ही पिके जळाली आहेत. जिल्ह्यात सोयाबीन पिकाचा जास्तीत जास्त पेरा हा बुलडाणा, चिखली, मेहकर, सिंदखेडराजा, लोणार, देऊळगावराजा, खामगावसह आदी तालुक्यांमध्ये होतो. या तालुक्यातील शेतकऱ्यांची सगळी भिस्त ही सोयाबीन पिकावर असते. परंतु या वर्षी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त झाल्यामुळे व दररोज तुरळक प्रमाणात का होईना पाऊस पडत असल्याने मूग, उडीद ही पिके जवळपास ९० टक्के पेक्षा अधिक बाधित झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग कमालीचा हतबल झाला आहे.
जून महिन्यात पेरणी करताना दमदार पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार, तर काहींना तिबार पेरणी करावी लागली. शेतकऱ्यांचा यामध्ये वेळ व पैसाच वाया गेला नाही तर बियाणे व मेहनत देखील वाया गेली. दरम्यान पेरणीनंतर सोयाबीनचे पीक चांगल्या प्रमाणात येईल, अशी आशा असताना जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे सोयाबीनची पिके पिवळी पडत आहे. तसेच पिकांची वाढ देखील खुंटली असून लहान झाडांना फुल येत आहे. अतिपावसामुळे सोयाबीन पिकाच्या मुळ्या देखील टिकाव धरत नाहीत. नदी, नाले ओसंडून वाहत असल्यामुळे शेतात जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे. अजून दोन महिने पावसाळा बाकी असल्यामुळे व सोयाबीनचे पीक येण्यास देखील दोन महिन्याचा अवधी असल्याने असाच पाऊस राहिला तर सोयाबीनचे संपूर्ण क्षेत्र बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश गावे ओल्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहेत.
बोरी येथे दुबार-तिबार पेरणी करावी लागली
बोरी गावामध्ये अनेक शेतकऱ्यांची दुबार, तिबार पेरणी झाली. त्यामुळे शेतकऱ्याचे पेरणी वेळीच खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पेरणीनंतर देखील संततधार पाऊस सुरू असल्याने खरिपातील मुख्य पीक असलेले सोयाबीनचे ५० टक्के पेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाले आहे. आजपर्यंत अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेताकडे धाव घेत पंचनाम्याची कार्यतत्परता दाखवली नाही.
अनंतराव चनखोरे, शेतकरी, बोरी.
...तर कोणतेच पीक हाती लागणार नाही
अतिपावसामुळे हळदीचे पीक देखील सुकले असून, तूर व सोयाबीनही पिवळे पडत आहेत. सोयाबीन पिकाच्या सोंगणीसाठी अजून साठ दिवसांचा अवधी बाकी असला तरी पुढील काळात असाच पाऊस सुरू राहिल्यास खरिपातील कोणतेच पीक हाती लागणार नाही. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व्हे करून मेहकरसह जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.
- गजानन फराटे, शेतकरी, मोळा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.