आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहक त्रस्त:महावितरण कार्यालयाला दीड हजार मीटर प्राप्त; मात्र वितरणाला होतेय दिरंगाई

खामगाव19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील तीन महिन्यापासून येथील महावितरण कार्यालयात विद्युत मीटरच्या तुटवड्यामुळे शेकडो नागरिकांना अद्याप पर्यंत विद्युत मीटर अभावी अंधारात राहावे लागले आहे़. विद्युत मीटरकरिता अर्ज आणि पैसे भरून सुध्दा विद्युत मीटर न मिळाल्याने उन्हाळ्याच्या उकाड्यात नागरिकांना नाइलाजास्तव दिवस काढावे लागले. मात्र नुकतेच महावितरणला सुमारे दीड हजार विद्युत मीटर मिळाले आहे. मात्र अभियंत्यांच्या दप्तर दिरंगाईमुळे अद्यापही नागरिकांना या विद्युत मीटरचे वितरण करण्यात आलेले नसल्याची ग्राहकांमध्ये ओरड आहे. सर्व मीटर हे महावितरणच्या शेगाव नाक्यावरील स्टोअर रूममध्ये येवून पडलेले आहेत. मात्र महावितरणच्या अभियंत्यांकडून या विद्युत मीटरच्या वितरणाबाबत कुठल्याच हालचाली होत नसल्याचे दिसून येत आहे.

शहरातील अनेक नागरिकांनी महावितरणकडे नवीन विद्युत जोडणीसाठी अर्ज करून मागील तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. मात्र अद्याप त्यांना विद्युत जोडणी करण्यात आलेली नाही. सदर ग्राहकांकडून रितसर अर्ज, विद्युत मीटरच्या पैशाचा भरणा ही करण्यात आला आहे. परंतु त्यांना महावितरणकडून अद्याप पर्यंत विद्युत मीटर देण्यात आलेले नाही. ग्राहक वारंवार महावितरणच्या कार्यालयामध्ये चकरा मारत आहेत. मात्र त्यांना कुठलेही समाधानकारक उत्तर अभियंत्यांकडून देण्यात येत नाही. मागील अनेक दिवसांपासून महावितरणला विद्युत मीटरचा पुरवठा करण्यात आला आहे़.

मात्र महावितरणच्या संबंधित अभियंत्यांच्या कासव गती कामकाजामुळे सदर विद्युत मीटर मुख्य कार्यालयाला आणि त्यांच्या उपकेंद्रांना अद्याप पोहोचवण्यात आलेले नाही. यामागचे कारण मात्र समोर आलेले नाही. सुमारे दीड हजार विद्युत मीटर येवून पडलेले असताना सुद्धा ग्राहकांना मीटर देण्यास विलंब का होत आहे? हा प्रश्न मात्र संबंधित ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे़. याकडे महावितरणच्या वरिष्ठ अभियंत्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

तुटवडा निर्माण झाल्यामुळे ग़्राहकांना नाइलाजास्तव बाजारातून महागडे मीटर घ्यावे लागतेय विकत येथील महावितरण कार्यालयात विद्युत मीटरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे बाजार पेठेत विद्युत मीटरचे भाव वाढविण्यात आले आहेत. नागरिकांना नाइलाजास्तव खाजगी दुकानांमधून २ हजार ५०० ते ३ हजार हजार रुपयांपर्यंत हे विद्युत मीटर विकत घ्यावे लागले आहे़. विद्युत मीटरचा तुटवडा भासवून खाजगी दुकानदारांशी संगनमत करत महावितरणच्या अभियंत्यांनी तर ही शाळा केली नसेल? अशी चर्चा ग्राहकांमध्ये सुरू आहे़. मात्र तीन ते चार महिने ग्राहकांना विद्युत मिटरसाठी ताटकळत ठेवल्याने नागरिकांकडून असा आरोप केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...