आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:मस, उतावळी ओव्हरफ्लो, तर खडकपूर्णा प्रकल्पातून विसर्ग ; दक्षतेचा इशारा

बुलडाणा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात यंदा गतवर्षीपेक्षा सरासरी ३८ मिमी. पाऊस जास्त पडला अाहे. या पावसामुळे खडकपूर्णासारख्या मोठ्या प्रकल्पासह तीन मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. त्यामुळे खडकपूर्णा, मस, कोराडी व उतावळी या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. दक्षतेचा इशारा या प्रकल्पाच्या नदीकाठावरील गावांना देण्यात आला आहे. हेच प्रकल्प गत वर्षीही शंभर टक्के भरले होते. मात्र यंदा आठ दिवसांपासून पावसाने उघाड दिल्यानंतरही धरणातील जलसाठा वाढला आहे. खडकपूर्णा सारखा प्रकल्प जालना जिल्ह्यात पाऊस पडल्यानंतर खडकपूर्णाच्या पात्राला पूर आल्यानंतर भरत असतो. असेच इतर धरणाचेही आहे. सर्व धरण कमी अधिक भरले असताना तोरणा मात्र २४.१९ टक्केच भरले आहे.

आजच्या दिनांकापर्यंत मागील वर्षी ३६५.३ मिमी. पाऊस पडला होता, तर यंदा ४०.३.८ मिमी पाऊस पडला आहे. या झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पासह सात मध्यम प्रकल्पातील जलसाठा ७०.३५ टक्के जलसाठा इतका आहे. भविष्यात पाऊस न पडल्यास काही प्रकल्पातून सिंचनाचा प्रश्न उपस्थित होऊ शकते. दरम्यान पिण्याच्या पाण्यासाठी जे प्रकल्प आहेत, अशा प्रकल्पातही जलसाठा उपलब्ध आहे. बुलडाणा शहरात तब्बल नऊ दिवसानंतर एक तास मुसळधार पाऊस झाला आहे. बुलडाणा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात सध्या ७५ टक्के साठा उपलब्ध आहे. गतवर्षी हे धरण जुलै महिन्यात भरल्याने स्वयंचलित गेट उघडले होते. जिल्ह्यात सध्याही लोणार, खामगाव, मलकापूर, नांदुरा, मोताळा, संग्रामपूर, जळगाव जामोद या तालुक्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे.

चार प्रकल्पातून होत असलेला विसर्ग
जिल्ह्यातील खडकपूर्णा या मोठ्या प्रकल्पासह मस, कोराडी व उतावळी हे तीन मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यापैकी खडकपूर्णा प्रकल्पाचे तीन दरवाजे ३० सेंमीने उघडण्यात आले असून, ९२.७० क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच मस प्रकल्पातून ०.५१ क्युसेस, कोराडी २४.७९ क्युसेस व उतावळी प्रकल्पातून २.०४ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

तीन मोठे व सात मध्यम मध्ये ७०.३५ टक्के जलसाठा
नळगंगा या मोठ्या प्रकल्पात ५०.३१ टक्के जलसाठा उपलब्ध झाला असून, खडकपूर्णा प्रकल्पात ७८.८८ टक्के व पेनटाकळी प्रकल्पात ७६.९२ टक्के जलसाठा झाला आहे. तसेच मध्यम प्रकल्प असलेल्या ज्ञानगंगा प्रकल्पात ७६.५३ टक्के, मस १०० टक्के, कोराडी १०० टक्के, पलढग ७४.४३, मन ९३.९८, तोरणा २४.१९ उतावळी प्रकल्प १०० टक्के तसेच ४१ लघु प्रकल्पात ४९.४२ टक्के जलसाठा उपलब्ध झाला असून, सध्या जिल्ह्यातील लहान-मोठ्या प्रकल्पात ७०.३५ जलसाठा उपलब्ध झाला आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने सरासरी ओलांडली
मागील वर्षी ६ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात एकुण ४७४८.५ मिमी. पावसाची नोंद असून, त्याची सरासरी ३६५.३ एवढी होती. यंदा याच तारखेपर्यंत जिल्ह्यात एकुण ५२४९.४ मिमी. पावसाची नोंद झाली असून, त्याची सरासरी ४०३.८ आहे. उपरोक्त आकडेवारी पाहता यंदा मागील वर्षीच्या तुलनेत पावसाने सरासरी ओलांडल्याचे दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...