आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार गायकवाडांचे वक्तव्य:मुस्लिम घेतात प्रोटीनयुक्त आहार, हिंदूंनी अंडी-मटन खावे; वारकरी सांप्रदाय संतप्त

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आमदार गायकवाड म्हणतात, मी चुकीचे बोललो नाही, वक्तव्यावर ठाम, बोलणारे वारकरी नाहीत ते भाजपचे चमचे.

कोरोना काळात मंदिरे बंद आहेत, तुम्हाला वाचवण्यास कोणी येणार नाही. उपास-तापास बंद करा, अंडे-मटन खा, मुस्लिमांमध्ये कोरोनामुळे क्रिटिकल होण्याचे प्रमाण कमी आहे, कारण ते सातत्याने प्रोटीनयुक्त आहार घेत असतात. असे वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी करुन पुन्हा एका वादग्रस्त वक्तव्याला जन्म दिला. त्यामुळे वारकरी संप्रदायात संतापाची लाट निर्माण झाली असून निषेध करतच अनेकांनी आमदार गायकवाड यांनाच फोन लावले अन् ते टॅप केलेले फोन सर्वत्र व्हायरल झाले आहेत. दरम्यान, आपण जे वक्तव्य केले त्यावर ठामच असून चुकीचे काहीही बोललो नसल्याचे आमदार गायकवाड यांनी दिव्य मराठी शी बोलताना सांगितले. तर बोलणारे हे वारकरी नाहीत तर भाजपचे वारकरी आघाडीतील चमचे आहेत. असेही ते म्हणाले.

गेल्या काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रात आमदार संजय गायकवाड यांनी कोरोनाच्या संकटावर बोलताना अंडे व मटन खाण्याची आपली भूमिका मांडली होती. त्यात त्यांनी हिंदु समाजात शाकाहारींची संख्या खूप आहे. त्यातच अनेक महिला-भगिनी उपास, व्रत धरतात. त्यांच्या शरीराला पोषक तत्वे मिळत नाही. रोगप्रतिकार शक्ती कमी होते. परिणामी कोरोनामुळे मृत्यू होतो. पण दररोज चार अंडे खाल्ले आणि किमान एक दिवसआड चिकन, मटन खाल्ले तर कोरोनाला आपण हरवू शकतो, असे सांगत प्रोटीनयुक्त आहार घेण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे हिंदुचा अवमान केल्याच्या प्रतिक्रिया वारकरी संप्रदायातून उमटू लागल्या. ह.भ.प रोहिणीताई राऊत संगमनेरकर, भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले, महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प प्रकाश महाराज जवंजाळ,गजानन महाराज दहीकर, भाजप अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सीताराम ठोकळ, वारकरी सांप्रदायिक कीर्तनकार ह.भ.प.प्रशांत महाराज पाटील यांच्यासह अनेकांनी आमदार संजय गायकवाड यांना फोन केले.

यावेळी आमदार गायकवाड यांनीही वक्तव्यावर ठाम राहत असभ्य भाषाही वापरल्याने वारकरी संप्रदायात मोठया प्रमाणात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या बाबत जिल्ह्यातील आमदारांशी संपर्क साधला असता आमदार राजेश एकडे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दर्शवला. आमदार संजय कुटे, आमदार श्वेता महाले, आमदारआकाश फुंडकर हे उपलब्ध झाले नाहीत. तर आमदार संजय रायमूलकर हे एमजीएमला गेलेले होते. देव देश अन् धर्माला गालबोट लावणे सर्वथा चुकीचे

समाज कोरोनाच्या भयाण संकटात सापडला असताना लोकप्रतिनिधींनी समजाप्रती सहानुभूती दाखवून धीर देण्याऐवजी धार्मिक भावनेला गालबोट लावून हिंदू समाजाचे खच्चीकरण थांबवावी. कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वच क्षेत्रातून शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.वैज्ञानिक, डॉक्टर, पोलीस, आरोग्य सेवक, संत,महंत आपापले कौशल्य पणाला लावून यावर उपाय शोधत आहे. अशा स्थितीत बुलडाण्याचे आ.संजय गायकवाड यांनी सनातन हिंदु धर्मीयांच्या भावनेला ठेच पोहोचेल असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे हिंदुंच्या, वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या आहेत. - ह.भ.प. सागर भोंडे महाराज, धाड

बातम्या आणखी आहेत...