आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दे धक्क्याला’ अखेर ब्रेक:पिंपळगाव राजा पोलिसांच्या ताफ्यात नवीन वाहन; जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात 14 वाहने दाखल

खामगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील १० पोलिस स्टेशनला व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या ताफ्यात ४ वाहने अशी जिल्ह्यात एकूण १४ वाहने पोलिसांच्या ताफ्यात रुजू झाली आहेत. त्यामुळे दे धक्का या मालिकेला कुठेतरी आता ब्रेक लागल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

जिल्ह्यातील पोलिसी नकाशात अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनच्या ताफ्यात काल गुरुवारी सायंकाळी नवीन बोलेरो वाहन रुजू झाले आहे. सायंकाळी ठाणेदार सतीश आडे यांनी सपत्नीक रूढी परंपरेनुसार बोलेरो पोलिस व्हॅनची पूजा केली. जिल्ह्यातील दहा पोलिस ठाण्यात व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात चार नवीन वाहने दाखल झाली आहेत. अनेक पोलिस ठाण्यातील ही वाहने दे धक्का झाली होती.

त्यामुळे पोलिसांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. पोलिसांची जुनी वाहने नादुरुस्त झाल्याने ऐन वेळेवर एखाद्या ठिकाणी पोहोचता येणे कठीण झाले होते. परिणामी पोलिसांना ही वाहने लोटून धक्का मारून सुरू करावी लागत होती. त्यामुळे नवीन वाहने केव्हा उपलब्ध होतील, असा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे प्रशासनाकडून काल ही वाहने पोलिसांच्या ताफ्यात दाखल झाली.

वाहनांची बनावट अतिशय सुरेख असल्याने आता पोलिसांना या वाहनांपासून मोठी मदत मिळणार आहे. जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाण्यातील वाहनांमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण होत असतानाच आता नवीन वाहने उपलब्ध झाल्याने पोलिसांना मदत झाली आहे. पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सतीश आडे यांनी ही माहिती दिली. यावेळी वाहन उपलब्ध झाल्यावर वाहनाची पूजा करण्यासाठी पोलिस कर्मचारी उपस्थित झाले होते.

बातम्या आणखी आहेत...