आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिला महाविद्यालयाने ५० वर्षांच्या काळात महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात महत्वाचे कार्य केले आहे. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील महाविद्यालयाचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे. आता महाविद्यालयाने कात टाकण्याची गरज असून, पारंपरिक अभ्यासक्रमांची कास न धरता आधुनिक जगाला अनुसरून नवनवे अभ्यासक्रम सुरू करण्याची अधिक गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ संचालित महिला महाविद्यालय, नागपूरच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष शुभारंभ कार्यक्रमाचे उद्घाटन रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
नंदनवन येथील महाविद्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्यासह स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस, उपाध्यक्ष विजय घाटे, कोषाध्यक्ष प्रदीप मंडलेकर, सदस्य दिलीप खोडे, प्रशांत पाध्ये, अतुल मंडलेकर, महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वंदना भागडीकर व सीमा फडणवीस यांची उपस्थिती होती. याप्रसंगी माजी प्राचार्य मालिनी पांढरीपांडे, माजी उपप्राचार्य सरोज जोशी, माजी प्राचार्य व अहिल्याबाई होळक्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, निवृत्त अधीक्षक अशोक फुलाडी यांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सरोज जोशी उपस्थित राहू शकल्या नाही. त्यामुळे त्यांच्या मुलाने हा पुरस्कार स्वीकारला.
संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस यांनी कॉलेजची धुरा सांभाळली असून, गडचिरोली जिल्ह्यातील मुलींना शिक्षण देऊन सामाजिक जबाबदारीही निभावली आहे. इतर शाळा, महाविद्यालयांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन गडकरी यांनी केले. संस्था स्थापनेत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या स्व. विजूभाऊ मंडलेकर व कृष्णराव भागडीकर यांच्याही कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
अध्यक्षीय भाषणात फडणवीस यांनी आजच्या शिक्षण पद्धतीत कसे आमूलाग्र परिवर्तन झाले आहे व शिक्षकांनी त्यानुसार कसे बदलले पाहिजे, यावर भाष्य केले. डॉ. मृणालिनी फडणवीस व मालिनी पांढरीपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी, दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळेच्या शिक्षिका उत्कर्षा महाजन व मीनल बावीस्कर यांनी स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविकातून डॉ. वंदना भागडीकर यांनी महाविद्यालयाचा स्त्री शिक्षणातील कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अपर्णा घुशे यांनी केले, तर आभार डॉ. प्रवीणा नागपूरकर यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.