आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:दोन महिन्यांपासून मलकापुरात प्लास्टिक वापरावर कारवाई नाही

मलकापूर / धीरज वैष्णव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यावरणाला बाधा पोहोचू नये, यासाठी शासनाने राज्यात प्लास्टिक बंदी केली आहे. ही बंदी असली तरी शहरात मागील दोन महिन्यांत प्लास्टिक वापरावर एकही कारवाई केली नाही. पालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने या बाबीला सुद्धा दुजोरा दिला आहे. पालिका प्रशासनाचा सध्या पर्यायी व्यवस्थेवर भर असल्याने ते शांत आहेत. तर दुसरीकडे किरकोळ प्लास्टिकचा वापर सुरू असला तरी व्यावसायिक व ग्राहकांमध्ये कारवाईची दहशत कायम आहे.

राज्य शासनाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने १ जुलै पासून प्लास्टिक बंदी घालण्यात आली आहे. त्यामध्ये एकल वापर, प्लास्टिकचे उत्पादन, झेंडे, साठवण, वितरण, विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली आहे. स्थानिक स्तरावर अधिसूचनेच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.

त्याच धर्तीवर शहरात फेरफटका मारला असता बऱ्याच अंशी व्यावसायिक प्लास्टिक बंदी निर्णयाची अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत आहे. परंतु दैनंदिन व्यवहारात मात्र मागील अनेक वर्षांपासून प्लास्टिक वापर नित्याचा झाला असल्याने ग्राहकांच्या अडचणीत वाढ झाल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. वास्तविक पाहता शासनाच्या प्लास्टिक बंदी निर्णयास महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. प्लास्टिक बंदी बाबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता मागील दोन महिन्यात प्लास्टिक वापरावर एकही कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे‌. तर प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. मात्र त्या आधी व्यावसायिकांना पर्याय देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्राहकांना करावा लागतो अडचणींचा सामना : दैनंदिन जीवनात प्रदूषण नियंत्रणासाठी प्लास्टिक बंदी काळाची गरज आहे. मात्र दुसरीकडे दैनंदिन व्यवहारात प्लास्टिक वापर गरजेचा झाला आहे. त्यामुळे भाजीपाला, औषधी, दूध, स्टेशनरी, कटलरी अशा वेगवेगळ्या वस्तू तथा साहित्य खरेदीसाठी ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

प्लास्टिक बंदीवर तोडगा काढण्यात यावा
शहरात मागील दोन महिन्यात प्लास्टिक वापरावर एकही कारवाई करण्यात आली नाही. या प्रक्रियेत प्लास्टिक वापरावर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. त्यामुळे कारवाई जरी नसली तरी त्याची दहशत मात्र व्यावसायिक व ग्राहकात कायम असल्याच दिसत असून प्लास्टिक बंदी विषयावर तोडगा निघावा, अशी अपेक्षा व्यावसायीक व्यक्त करीत आहेत.

व्यावसायिकांना पर्याय देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत
प्लास्टिक वापरावर एकही कारवाई झाली नाही. परंतु व्यावसायिकांना त्यावर पर्याय देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी बचत गटांना कापडाच्या किंवा कागदाच्या पिशव्या बनविण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. त्यांच्याकडून नमुने घेवून पर्याय देण्यात येईल. त्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे.
-योगेश घुगे, पालिका आरोग्य अधिकारी

बातम्या आणखी आहेत...