आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावात जायला रस्ता नाही:मलकापूर पांग्राच्या गावकऱ्यांचा कंबरेइतक्या पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूर पांग्रा (ता. सिंदखेड) गावच्या गावकऱ्यांना चक्क जीव धोक्यात घालून कंबरेइतक्या पाण्यातून प्रवास करावा लागतो आहे.

देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करतोय. मात्र, अजूनही गावाला धड रस्ता नसल्याबद्दल गावकरी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करतायत.

नदीवर पूल नाही

मलकापूर पांग्रा गावाच्या दक्षिण पश्चिमेकडील गांजरवाडीतून जाणाऱ्या शेत शिवाराच्या रस्त्यावर वाकद- केशव शिवणी शीवहद्दीपर्यंत 150 शेतकरी कुटुंब पक्के घर बांधून कायम शेतात राहतात. मात्र, गावच्या पश्चिमेकडून वाहणाचा मुर्डायणी नदीवर पूल नसल्यामुळे कमरेएवढ्या पाण्यातून जीव मुठीत धरून नदीपात्र ओलांडून दररोज ये-जा करावी लागते. सध्या या शेतकरी कुटुंबासह 150 पेक्षा अधिक विद्यार्थी, 500 ते 600 शेतमजूर यांना दररोज शाळेत, गावात, शेतात मजुरीला जाण्या-येण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतोय.

कच्चा रस्ताही खचला

चार किलोमीटरच्या या शेतशिवार रस्त्यावर गावापासून 2 किमीपर्यंत 10 वर्षांपूर्वी कच्चा भराव टाकून शेतरस्ता केला आहे. मात्र, त्यावर दबईकरण किंवा खडीकरण केलेले नसल्यामुळे तोही खचला आहे. पुढील 2 किमीच्या पांदण रस्त्यातील चिखल आणि नदीवरील पुलाच्या समस्येमुळे वाहन जात नाही. त्यामुळे पावसाळ्यात विद्यार्थी, शेतकरी कुटुंब, शेतमजूर यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे

रस्ताच नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर वाईट परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना शेतमाल आणता येत नाही. रुग्ण, गर्भवती महिला, वयोवृद्ध यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. या ठिकानी मोठी दुर्घटना घडून जीवीतहानी होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विदर्भाचे सुपुत्र उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लक्ष घालून यंत्रणेला योग्य ते निर्देश द्यावेत, अशी मागणी विद्यार्थी, शेतकरी, महिला, वयोवृद्ध, शेतमजुरांसह श्रीराम आटोळे, शेख हन्नान, गजानन साळवे, दिलीप काकडे, शरद देशमुख, गजानन गावंडे, मोहन आटोळे, गजानन केवट यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...