आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना पक्ष वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला. बुलडाण्यातील शिवसेनेचे घर वाचवण्यासाठी बाहेर पडलो असून विधानसभेमध्ये शिवसेना गट म्हणून आम्ही बसलो आहोत. येणाऱ्या काळात शिवसेना म्हणून आमच्या शिंदे गटाला मान्यता मिळेल व संख्याबळावर धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटालाच मिळेल असा दावा खा. प्रतापराव जाधव यांनी युवा सेनेच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना केला आहे.
युवा सेनेचे जिल्हा अधिकारी ऋषिकेश जाधव व युवा सेनेचे नेते नीरज रायमूलकर यांनी रविवारी युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. आ. डॉ. संजय रायमुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करून त्यांचे स्वागत केले. अध्यक्षस्थानी खा. प्रतापराव जाधव होते. प्रमुख उपस्थितीमध्ये सत्कारमूर्ती आ. डॉ. संजय रायमुलकर, जिल्हा अधिकारी ऋषिकेश जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश वाळूकर, शहर प्रमुख जयचंद बाठीया, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माधवराव जाधव, युवा सेनेचे नेते नीरज रायमुलकर, राजेंद्र पळसकर, नगराध्यक्ष संजय जाधव,योगेश जाधव, शहराध्यक्ष भुषण घोडे, खंडू सवडतकर, अर्जुन नेमाडे, शंतनू मापारी, तेजराव जाधव, गजेंद्र मापारी, समाधान साबळे यांची उपस्थिती होती. यावेळी ऋषिकेश जाधव म्हणाले की, मेहकर तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला असून २४ तास आम्ही कुटुंबप्रमुख म्हणून तालुक्याची सेवा करत आहे. तालुक्यामध्ये अचानक शिवसेनेवर काही लोकांना जास्तीचे प्रेम आले असून राष्ट्रवादी व काँग्रेसचे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शिवसेनेचा प्रचार करणारे ग्रामीण भागातील युवकांना फुस लावत आहे.
मुख्यमंत्री केवळ नावालाच होते : आ. डॉ. रायमूलकर
आमचे बंड नसून उठाव आहे. शिवसेना नेते संजय राऊत हे आमच्या मतांवर निवडून आले, त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन मगच आमच्यावर बोलावं. शिवसेनेचे मुख्यमंत्री केवळ नावाला होते. सरकार राष्ट्रवादी चालवत होती. लोणार सरोवर, पेनटाकळी प्रकल्पासाठी आदित्य ठाकरे यांच्याकडे गेलो असता ते भेटायचे तर सोडाच न बोलता समोरून निघून जायचे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आत बसून काम करायचे आणि शिवसेनेचे आमदार बाहेर वेटिंग रूममध्ये थांबायचे. अनेकदा पत्र लिहले पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. त्यामुळे अन्यायाविरुद्धचा हा उठाव आहे. एक दिवसही कार्यालयात न बसलेला मंत्री म्हणजे आदित्य ठाकरे होते. पेनटाकळी व इतर प्रकल्पाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. तर लोणार सरोवरासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ निधी दिला. भावी आमदार म्हणून जे मिरवत आहेत त्यांचा भ्रमनिरास अटळ असल्याचेही आ. डॉ. रायमूलकर म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.