आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंताजनक:शाळा सुरु होण्यास अवघे सात दिवस बाकी; पण, अद्याप शाळेच्या बसची तपासणीच नाही

बुलडाणा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळा सुरु होण्यासाठी सात दिवसांचा कालावधी बाकी आहे. बहुतांश शाळा, कॉन्व्हेंट स्कूलमध्ये विद्यार्थी ने-आण करण्यासाठी बसचा वापर केला जातो. अशा बसेस व वाहनांची संख्या जिल्ह्यात १६० च्या जवळपास आहे. शाळा सुरु होण्यापुर्वी आरटीओकडे अशी वाहने तपासणीसाठी दाखल करावी लागतात. मात्र शाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यानंतरही फक्त ५१ बसची तपासणी झाली आहे. जवळपास १०९ बसची तपासणी करण्यास शाळा संचालक किंवा बस मालक, चालक वेळ लावत आहे. परिणामी भविष्यात एखाद्या दुर्घटनेला सामोरे जाण्याची वेळ आल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण एक हजार ४५८ इतक्या शाळा आहेत. यातील एक हजार ४३० शाळा ग्रामीण भागात असून शाळांमध्ये जवळपास एक लाख ५८ हजार १७५ विद्यार्थी आहेत. यावेळी पहिलीच्या विद्यार्थ्यांची त्यात भर पडणार आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या स्कूल बसेस नाही आहेत. जिल्ह्यात नगर परिषदेच्या १०४ शाळा आहेत यामध्ये २१०८३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पालिकेच्या शाळांमध्येही बसेस नाहीत व तसेही पालिकांच्या शाळांची अवस्था खराब असून विद्यार्थी बसची भाडेही भरु शकणार नाही, अशी परिस्थिती आहे. मात्र खासगी शाळांमध्ये बसची व ऑटो द्वारे विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांची संख्या ५१६ इतकी असून यामध्ये ३८१ शाळा ग्रामीण भागात आहेत.

जिल्ह्यातील खासगी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास दोन लाख ३० हजार ७५२ पेक्षा अधिक आहे. खासगी विना अनुदानित शाळांची संख्या ४१४ आहे. यापैकी ग्रामीण भागात २८४ शाळा आहेत. या शाळांमध्ये एक लाख एक हजार ९२७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. असे सर्व मिळून पाच लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शहरी व ग्रामीण भागात शिक्षण घेत आहेत. यातील फक्त दहा ते पंधरा टक्के विद्यार्थी शाळेच्या बसचा वापर करत आहेत.

बसची तपासणी कशासाठी बसमध्ये किती सीट आहेत. त्या सीट सुरक्षित आहेत की नाही, याची पडताळणी करणे आवश्यक आहे. बसला काचा आहेत की नाही, प्रथमोपचार किट आहे की नाही, ब्रेकची अवस्था कशी आहे, आरसे आहेत की नाही, परवाना केव्हा पर्यंत आहे, अग्निशमन यंत्रणा अद्ययावत आहे की नाही, विद्यार्थ्यांना दप्तर ठेवण्यासाठी कॅरिअर्स आहे की नाही. यासह यांत्रिकी बाबींची तपासणी करण्यासाठी बस आरटीओ कार्यालयात तपासणी करण्यासाठी आणल्या जातात. ही तपासणी दरवर्षी करणे आवश्यक आहे.

अजून सुरक्षा समितीची बैठक नाही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शाळांमधील सुरक्षा समितीची बैठक बोलावली जाते. आरटीओ, पोलिस अधीक्षक, मुख्याध्यापक आदींची ही बैठक शाळा सुरु होण्यापूर्वी घ्यावी लागते. त्यानंतर शाळाही ऑटो चालक, बसचालकांची बैठक घेऊन सुरक्षेविषयी माहिती देतात. अशी बैठक अद्याप झाली नाही.

४० टक्के विद्यार्थी ऑटोने करतात प्रवास ग्रामीण भागातून विद्यार्थी शहरी भागात शाळा शिकण्यासाठी येतात. गेल्या शैक्षणिक वर्षात एस.टी.बंद असल्याने विद्यार्थी गावातील ऑटो, ट्रॅक्टर आदी वाहनांनी शहरी भागात शिक्षणासाठी येत होते. यावेळी बसेस सुरु झाल्याने एस.टी.तून प्रवास करण्यासाठी बहुतांश विद्यार्थी येतात. मात्र काही गावातीलच ऑटोने येत असतात. शहरी भागातही ऑटो लावलेले असतात. एका ऑटोतील विद्यार्थ्यांची संख्या ही चिंतनीय बाब ठरते. असे ४० टक्के विद्यार्थी ऑटोने शाळेत ये-जा करतात.

बातम्या आणखी आहेत...