आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफलोत्पादन क्षेत्रात बुलडाणा जिल्ह्यात एक लाख २५ हजार ५६३ टनाचे उत्पादन विविध फळांपासून होत असून, संत्रा फळाचे उत्पादन सर्वाधिक ७७ हजार ५९० मेट्रिक टन इतके आहे. संग्रामपूर तालुक्यात सर्वाधिक संत्र्याच्या बागा आहेत. संत्रा प्रक्रिया उद्योगामुळे फळबागांकडे कल वाढणार असला तरी हा उद्योग शेतकऱ्यांच्या माध्यमातून राबवण्यात येणार की, उद्योजकांच्या हे मात्र निश्चित झाले नाही. शेतकरी गटांच्या माध्यमातून हा उद्योग सुरू करण्यासाठी कृषी विभागाचा आत्मा हा विभाग मात्र सज्ज आहे. कृषी विभागाकडे मात्र या उद्योगासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. फळबाग लागवडीसाठी शासनाकडून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येते.
या वर्षी १३४९.२५ हेक्टर क्षेत्रावर चार लाख ९५ हजार ८३४ कलमे, रोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये आंबा, केळी, चिकू, डाळिंब, मोसंबी, संत्रा, कागदी लिंबू, चिंच, सीताफळ, आवळा, बोर रोपे, जांभूळ, अंजीर इत्यादी फळांचा समावेश आहे. सर्वाधिक लागवड संत्रा फळांची झाली आहे. ५८७.३५ हेक्टर क्षेत्रावर दोन लाख ८ हजार ८९० कलमांची लागवड ६८४ शेतकऱ्यांनी केली आहे. हा भाग बहुतांश संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील आहे. संत्र्याची लागवड अधिक प्रमाणात असल्याने संत्रा प्रक्रिया उद्योगातून शेतकरी हित साधले जाण्याची शक्यता आहे. २० कोटी रुपये या उद्योगासाठी मिळणार असले तरी ते कसे मिळणार याची अजूनही माहिती उपलब्ध होणे बाकी आहे. मलकापूर, नांदुरा, शेगाव, देऊळगावराजा या भागात संत्रा लागवड केली नाही. मेहकर व सिंदखेडराजा या भागात यंदा सर्वाधिक लागवड करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.