आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदासीन:वीस लाख 34 हजार मतदात्यांपैकी 3 लाख 44 हजारांचीच आधार ‘लिंक’ ; राजकीय नेत्यांकडून जागृती नाही

बुलडाणा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात मतदान कार्डाला आधार लिंक करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केल्यानंतर तीस दिवसांत वीस लाख ३४ हजार मतदात्यांपैकी केवळ तीन लाख ४४ हजार २८९ मतदात्यांनी आधार लिंक केले आहेत. मिळालेला हा प्रतिसाद फक्त १६.९३ टक्के इतकाच अल्प आहे. तर अजूनही ऑनलाइन मतदार म्हणून नोंदणी केलेल्यांचे नोंदणी झाल्याचे त्यांना कळाले नाही. बोगस मतदानाला आळा घालणारी ही चांगली संधी असताना राजकीय नेत्यांकडून मात्र आधार लिकिंगला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

जे मतदार जिल्हा परिषद मतदार संघात मोडतात तेच मतदार नगर पालिकेच्या निवडणुकीतही मतदान करतात. परंतु त्यांचे नाव मतदार यादीत असल्याने त्यांना कोणी काही म्हणत नाही. बाहेरगावच्या लोकांची नोंदणी करुन ठेवणे व ते गठ्ठा मते आपल्या पारड्यात टाकण्याची कला काही राजकीय लोकांना अवगत आहे. दरवेळी असेच घडत असल्याचा आरोपही होतो. आधार लिंक केल्यास आळा बसण्याची दाट शक्यता असल्याने आधार लिंक केले जात आहे.

सर्वात कमी बुलडाणा
बुलडाणा मतदार संघात मतदार कार्डाशी आधार लिंक करण्याचे प्रमाण सर्वात कमी आहे. फक्त ३.०८ टक्के इतके लिंकिंग झाले आहे. यातही लिंक करणारे जास्तीत जास्त कर्मचारीच असण्याची शक्यता आहे. दोन लाख ९२ हजार १८६ इतके मतदार बुलडाणा विधानसभा मतदार संघात आहेत. मात्र आधार लिंकिंग फक्त ८९९२ इतकीच आहे.

मतदार संख्या सध्या २० लाख ३४ हजार ९५ इतकी तर २३ हजाराने मतदार वाढले
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्याची मतदार संख्या वीस लाख १० हजार ४६८ इतकी होती. सध्या वीस लाख ३४ हजार ९५ इतकी झाली आहे. जवळपास २३ हजार ६२७ इतके मतदार वाढले आहेत. विधान सभा मतदार संघानिहाय लक्षात घेता त्यावेळी मलकापुरची मतदार संख्या दोन लाख ६४ हजार ६४२ होती सध्या दोन लाख ७१ हजार ०९३ इतकी आहे. सहा हजार ४५१ ने वाढली आहे. बुलडाणा मतदार संख्या तीन लाख दोन हजार ३५१ होती आता दोन लाख ९२ हजार १८६ आहे. म्हणजे दहा हजार १६१ ने कमी झाली आहे. चिखली मतदार संघाची दोन लाख ९१ हजार २२१ होती आता दोन लाख ९० हजार १९७ आहे म्हणजे एक हजार ०२४ ने कमी झाली आहे. सिंदखेड राजा मतदार संघाची तीन लाख सहा हजार ८९६ होती आता तीन लाख १० हजार १५७ आहे. तीन हजार २६१ ने वाढ झाली आहे. मेहकर मतदार संख्या दोन लाख ८७ हजार ०७४ होती आता दोन लाख ९२ हजार १९८ आहे म्हणजे पाच हजार १२४ ने वाढली आहे. खामगाव मतदार संघाची दोन लाख ७६ हजार ३६८ इतकी होती आता दोन लाख ८२ हजार ८२९ इतकी आहे म्हणजे सहा हजार ४६१ ने वाढ झाली आहे. जळगाव जामोद मतदार संघाची दोन लाख ८१ हजार ९१६ इतकी होती आता दोन लाख ९५ हजार ४३५ इतकी आहे. म्हणजे तेरा हजार ५१९ ने वाढ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...