आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रात्यक्षिकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर संस्कार होतात. यासह त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेत त्यांनी सहभागी होणे गरजेचे आहे. कारण एन.एस.एस. हे युवकांना प्रत्यक्ष अनुभूती देत असते, असे प्रतिपादन सिंदखेडराजा तहसीलचे तहसीलदार सुनील सावंत यांनी केले.
दत्तक ग्राम पिंपळगाव चिलमखाँ येथे श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या रा.से.यो. विशेष श्रम संस्कार शिबिर समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे उपस्थित होते.
व्यासपीठावर सरपंच पती दीपक पवार, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. बी. यू. काळे व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.महाविद्यालयातील रा.से.यो. विभागाच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव हे ब्रीद घेऊन विशेष श्रम संस्कार शिबिर आयोजित केले होते. या कार्यक्रमात अतिथी तहसीलदार सुनील सावंत यांनी युवकांना संस्कृतीचे संवर्धन करण्यासंदर्भात आवाहन केले. पिंपळगाव हे एक आदर्शवत गाव आहे. या गावाला विविध पुरस्कार मिळालेले आहेत. यामध्ये श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांचे योगदान आहे ही आनंदाची बाब आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. अध्यक्ष म्हणून उपस्थित प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील समस्या समजून घेता याव्या व सोडवता याव्या यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात येते, असे मत व्यक्त केले.
रासेयो शिबिरादरम्यान विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये कथा-कथन, कवी संमेलन यासह सांस्कृतिक कार्यक्रमांचा अंतर्भाव होता. दुपारच्या बौद्धिक सत्रात विद्यार्थ्यांसाठी व सायंकालीन सत्रात ग्रामस्थांसाठी विविध विषयावर अतिथी व्याख्याने आयोजित करण्यात आली. या शिबिरादरम्यान स्वयंसेवकांनी ग्राम स्वच्छता, शोष खड्डे खोदणे, जनजागृती असे विविध उपक्रम राबविले.
सिकल सेल तपासणी व रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले. शिबिर समारोप समारोहाचे सूत्रसंचालन सहकार्यक्रम अधिकारी डॉ. महेंद्र साळवे यांनी केले. महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. रूपाली तेलगड यांनी कामकाजाचा आढावा मांडला. उपस्थितांचे आभार कार्यक्रम अधिकारी प्रा. बी. यू. काळे यांनी व्यक्त केले. शिबिर यशस्वीरित्या आयोजित करण्यासाठी श्री बालाजी संस्थानचे वंश पारंपरिक विश्वस्त व महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.