आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा कसला जीवघेणा गैरसमज:आरोग्य कर्मचाऱ्यांना पाहूनलोक दारं करताहेत बंद

मंदार जोशी/गणेश सुरसे | बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
वसाडीतील शिवदास वाकळे कोरोना झाल्यानंतर गोठ्यातच क्वॉरंटाइन झाले. छाया : अनिस शेख - Divya Marathi
वसाडीतील शिवदास वाकळे कोरोना झाल्यानंतर गोठ्यातच क्वॉरंटाइन झाले. छाया : अनिस शेख
  • अज्ञानामुळे कोरोनाचे संक्रमण, 15 दिवसांत 12 रुग्णांचा मृत्यू

कोरोनामुळे रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर मृतदेह कुटंुबीयांना मिळत नाही म्हणून घरातच मरण आलेले बरे, या गैरसमजातून बुलडाणा जिल्ह्यातील वसाडी गावात गेल्या १५ दिवसांत तब्बल १२ जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार “दिव्य मराठी’च्या ग्राउंड रिपोर्ट टीमच्या निदर्शनास आला. महाराष्ट्र - मध्य प्रदेश सीमेवरील या दुर्गम गावात कोरोनाच्या लढ्यात या जीवघेण्या गैरसमजामुळे गावकरी आणि प्रशासन असा वेगळाच झगडा उभा राहिला आहे. दिवसागणिक लोक दगावत आहेत, पण आरोग्य कर्मचारी आले की लोक दारं लावून घेत आहेत. विशेष म्हणजे, आपल्या गावातील हे मृत्यू कोरोनामुळे झाले नसल्याची जाहिरातच या गावकऱ्यांनी एका दैनिकात प्रकाशित केली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील वसाडी गावाला “दिव्य मराठी’ टीमने गुरुवारी (१३ मे) भेट दिली. गावकऱ्यांत कोरोनाविषयी अनेक गैरसमज, अंधश्रद्धा असल्याचे निदर्शनास आले. महाराष्ट्र - मध्य प्रदेश सीमेवरील या दुर्गम गावात अडीच हजार लोकवस्तीचे हे गाव, पण कोरोना चाचणी शिबिराला फक्त ७५ जणांनी हजेरी लावल्याचे ग्रामसेवक सांगतात. सरकारी वाहन गावात आली की लोक घाबरून दार बंद करतात. सातपुड्याच्या डोंगर रांगेत असलेले हे महाराष्ट्राचे शेवटचे गाव. या गावानंतर १५ किलोमीटरवर मध्य प्रदेशची हद्द सुरू होते. ५० किलोमीटर दूर पर्यंत कोणतेही मोठे हॉस्पिटल नाही. जवळचे गाव वरवट बकाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची दयनीय अवस्था आहे. गावातील उपकेंद्रात डॉक्टर नाही. एक परिचारिका ते चालवते. मात्र तिच्या कुटुंबातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे हे केंद्र दहा दिवसांपासून बंद होते. भिल्ल, तडवी, कोरकू, निहाल, भिलाला या आदिवासी समाजाचे लोक या गावात रहातात.

ज्यांना जाण त्यांचेही हाल : काहींना या आजाराचे गांभीर्य कळलंय, पण त्यांची उपचारासाठी पायपीट सुरू आहे. तापाने अंग फणफणले होते. शरीर गळून गेले होते. शेगावला उपचारासाठी गेलो. तेथे हॉस्पिटलमध्ये जागा नव्हती. संग्रामपूरला ऑक्सिजन नसल्याचे सांगितले. नातेवाईक आणि मित्राकडून उपचारासाठी १५ हजार रुपये उसने घेतले. अखेर डॉक्टरांकडून गोळ्या औषधी लिहून घेतली. जे होईल ते गावाकडेच असा विचार केला. मेलो तर चार लोक खांद्या देतील. अखेर देवाला दया आली. आता तब्येत बरी आहे. घरच्यांना माझ्यामुळे त्रास नको म्हणून मी मागील दहा दिवसांपासून गोठ्यात राहत आहे, असे बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वासडी गावात राहणाऱ्या शिवदास समाधान वाकळे यांनी सांगितले.

पंचक्रोशीत देखील मृत्यूचे तांडव : वसाडी, हडियामल, निमखेडी, चिचारी, आलेवाडी, रोहिणखिडकी, पिंगळी बु., टूनकी बु, लाडणापूर, सोनाळा, या गावांमध्ये मार्च पासून १० मे पर्यंत ५५ लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाने वसाडी येथे एक मृत्यूची नोंद आहे. सोनाळा येथील २ लोकांची नोंद आहे. इतर मृत्यू दुर्धर आजाराने झाल्याची माहिती दिली जात आहे.

आम्हाला कोरोना होत नाही.. तो तर शहरातल्या लोकांनाच होतो!
आम्हाला कोरोना होणारच नाही, तो तर शहरातल्या लोकांना होतो, असा या गावकऱ्यांचा गैरसमज आहे. त्यात रुग्णालयात मृत्यू झाला तर मृतदेह कुटुंबीयांना मिळणार नाही, विधिवत अंत्यसंस्कार होणार नाहीत या गैरसमजातून आजार लपवला जातो. यामुळे येथील आरोग्य कर्मचारी आणि प्रशासनही वैतागून गेले आहे. दुसरीकडे कितीही त्रास झाला तरी गावात आणि घरातच उपचार घेण्याचा सर्वांचाच कल आहे.

‘कोरोना नाही’, अशी जाहिरात
गावातील सगळे मृत्यू हे कोराेनाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींचेच झाले आहेत. मृत्यू झालेल्या सगळ्यांची वये ही साठीच्या पुढची आहेत. आमच्या गावातील मृत्यू हे कोरोनामुळे झालेच नाहीत. यामुळे गावाची बदनामी होत आहे, असेही गावकऱ्यांचे म्हणणे आहे. लोकप्रतिनिधींनीही कोरोनामुळे मृत्यू झाले नाही, अशी जाहिरातच स्थानिक वर्तमानपत्रात दिली आहे.

लोकांचे मनोबल उंचावण्यासाठी सरपंच पतींनी घेतली लस
रुग्णालयात गेल्या महिनाभरात १२ जणांच्या मृत्यूनंतर सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी लोकांशी चर्चा करून त्यांचे मनोबल वाढवले. त्यांच्या मनातून गैरसमज दूर करण्यासाठी स्वत: सरपंचांनी पहिल्यांदा कोरोनाची लस घेतली. यानंतर दोन दिवस त्यांची प्रकृती ठीकच होती. लसीचे काहीच दुष्परिणाम नसल्याची खात्री झाल्यानंतर गावकऱ्यांनी उपचार व लस घेण्यास सुरुवात केली. गेल्या १५ दिवसांत गावातील १६१ चाचण्यांपैकी १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. उपचार घेतल्यानंतर त्यातील १० रुग्ण बरे झाले तर इतर ८ रुग्ण विलगीकरणात आहेत. ४५ ग्रामस्थांनी कोरोनाची पहिली लसदेखील घेतली आहे.

गावकऱ्यांना समजावतो आहोत
गावातील लोकांचे सममुपदेशनासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. गावात कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात १६५ जणांनी सहभाग घेतला लसीकरण देखील करण्यात आले. याची सुरुवात आम्ही आमच्या पासून केली. आता लोक लस घेण्यासाठी पुढे येत आहेत. - हुसैन पालकर, सरपंच पती

गावकऱ्यांनी सहकार्य करावे
मागील १५ ते २० दिवसांत गावात १२ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे काही वृद्धापकाळाने तर काही दुर्धर आजाराने झाले आहेत. आतापर्यंत गावात कोरोना चाचणीचे तीन शिबिरे घेतली. त्यात ७५ लोकांनी सहभाग घेतला. ग्रामपंचायत किंवा आरोग्य विभागाचे कर्मचारी घरी गेल्यानंतर लोक दारे लावून घेतात. - बी.पी धोंडगे, ग्रामसेवक, वसाडी

बातम्या आणखी आहेत...