आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंताजनक:पिंप्री आंधळे पाठोपाठ नागणगावात डेंग्यू सदृश्य तापाचा शिरकाव ; आरोग्य विभागाचे पथक दाखल

अंढेरा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथून जवळच असलेल्या नागणगाव येथे पिंप्री आंधळे गावा पाठोपाठ डेंग्यू सदृश्य तापाचा शिरकाव झाला आहे. नागणगाव येथील एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्या बहिण-भावावर औरंगाबाद व जालना येथे उपचार सुरू असताना देखील आरोग्य विभागाचे कर्मचारी गावात फिरकले नाहीत. त्यामुळे नागणगावच्या ग्रामस्थांनी आरोग्य विभागाविरोधात सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान, याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दत्ता मांटे यांना मिळताच त्यांनी ४ सप्टेंबर रोजी अंढेरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक नागणगावात तपासणीसाठी पाठवले.

मागील काही दिवसांपासून अंढेरा प्राथमिक आरोग्य केंद्र वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्यातच येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल रिंगे हे मेडिकल सुटीवर गेल्याने तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. अंढेरा प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या पिंप्री आंधळे व नागणगावात डेंग्यू सदृष्य तापाचा शिरकाव झाला. मागील काही दिवसापूर्वी पिंप्री आंधळे येथील एका महिलेचा डेंग्यू सदृश्य तापाने मृत्यू झाल्यामुळे उपरोक्त दोन्ही गावचे ग्रामस्थ भयभीत झाले आहे. असे असताना देखील आरोग्य विभागाचे कर्मचारी गावात फिरकत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.नागणगाव येथील काही बालकांना डेंग्यू सदृश तापाची लक्षणे दिसत आहे. अर्ध्याहून अधिक गावात तापेचे रुग्ण आहे. गावातील एका कुटुंबातील १२ वर्षीय चिमुरडीवर प्रथम चिखली येथे व त्यानंतर ताप आटोक्यात येत नसल्याने नंतर औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू अाहे. तर तिच्याच आठ वर्षाच्या भावावर सुध्दा सतर्कता म्हणून जालना येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. इतरही काही रुग्ण तापाने फणफणत असल्यामुळे देऊळगाव मही,चिखलीसह आदी ठिकाणी जाऊन खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती केली. मात्र तेथील कर्मचारी हे आपल्या कामात कुचराई करत असल्याने शासनाची ही आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कुचकामी ठरत आहे. नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांकडून ग्रामस्थांच्या आरोग्याबाबत कायम हलगर्जीपणा होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे.नागणगावात डेंग्यू सदृश तापाचे रुग्ण आढळल्याने ऐन महालक्ष्मीच्या सणाच्या दिवशी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दत्ता मांटे यांनी डिग्रस उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर गिते व अंढेरा येथील आरोग्य सेवक विजय झिने,संजय वाघ यांना तात्काळ नागणगाव येथे पाठवले. दरम्यान, पथकातील कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या घरोघरी जावून सर्वेक्षण करत डॉ.किशोर गिते यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांचे रक्ताचे नमुने घेतले.यावेळी सुरेश गिते, बबन दास, नितीन वायाळ, शिंगणे, अनिल सरोदे आदी उपस्थित होते.

नागरिकांनो, अशी घ्यावी डासांपासून काळजी
नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे, घरातील पाणी साठे रिकामे करुन आठवड्यातून एक दिवस”कोरडा दिवस” पाळावा. तसेच डास होणार नाही म्हणून गावात ठिकठिकाणी गप्पी मासे सोडावे. डासांपासून संरक्षण करण्यासाठी ऑल आऊट व इतर उपकरणांचा वापर करावा. पूर्ण अंग झाकेल असे कपडे परिधान करावे. जनावरांचे गोठ्याची फवारणी करत नागरिकांनी अशा प्रकारे काळजी घ्यावी.
-डॉ. दत्ता मांटे, तालुका आरोग्य अधिकारी

बातम्या आणखी आहेत...