आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भांडवल:चालना 22535 बचत गटांपैकी 10919 गटांना मिळाले खेळते भांडवल

बुलडाणा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात कार्यरत असलेल्या २२ हजार ५३५ बचत गटांपैकी १० हजार ९१९ गटांना खेळत्या भांडवलाचा लाभ मिळाला आहे. एकूण एक हजार ६०७ लाख ८८ हजार रुपये खेळते भांडवल या बचत गटांकडे आहे. तर समुदाय गुंतवणूक निधीतून ९०९ बचत गटांना ५४७ लाख २ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. जोखीम प्रवणता निधीतून ८९६ गटांना ८२ लाख ४३ हजार रुपये मिळाल्याने अत्यंत गरीब लोकांचा फायदा झाला आहे. एकीकडे खेळते भांडवल कमी गटांकडे उपलब्ध असताना बँकेने ३८ हजार ०११ .५९ लाख अर्थसाहाय्य केलेल्या बचत गटांची संख्या २३ हजार ५४८ इतकी आहे.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जीवनोन्नती अभियान राज्यात राबवले जाते. पूर्वीचा बचत गटांचा अनुभव घेता प्रोत्साहन देऊन बचत गट चालवण्याचे कार्य जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा करत आहे. बचत गटांकडे खेळते भांडवल असल्यास बँका तत्परतेने कर्ज देतात. त्यातून बचत गट सक्षम होऊन त्यांचा कार्यभार सुरळीत व चांगला चालतो. बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. बहुतांश बचत गटांना खासगी बँका किंवा पतसंस्थाही चालना देतात. मात्र त्या बचत गटांचा या अभियानात सहभाग नसतो.

पूर्वी एनजीओ हे बचत गट चालवत होते. आता ऑनलाइन कारभारामुळे बचत गटांना प्रोत्साहन देऊन बचत गट सक्षम करण्याचे काम केले जात आहे. कोरोना काळातही अनेक बचत गटांनी आपले कर्तव्य सिद्ध केले आहे. तोंडाला लावण्याचे मास्क बनवणे, महिलांसाठी पॅड बनवण्याचे कामही बचत गटांनी केले. जिल्ह्यात दिवाळीत बचत गटांची प्रदर्शनही भरवण्यात आले.

बचत गटांना मिळतो दहा ते पंधरा हजार रूपयांचा निधी : बचत गटांना दहा ते पंधरा हजार एवढा निधी दिला जातो. सबसिडी हा प्रकार बंद करण्यात आला आहे. या दहा ते पंधरा हजारांवर राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज वाटप केले जाते. कर्ज त्वरीत भरल्यास कर्ज पुन्हा उपलब्ध करुन दिल्या जाते. याकरता प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळेच २२ हजार ५३५ बचत गट असताना बँकेचे अर्थसाहाय्य मिळालेल्या बचत गटांची संख्या २३५४८ इतकी आहे. कारण यात पुन्हा कर्ज घेतलेल्या बचत गटांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे., अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या मार्फत देण्यात आली.

बचत गटांची संख्या अशी
बुलडाणा २२५३, चिखली २५७८, देऊळगाव राजा १२९६, जळगाव जामोद १३५५, खामगाव २४५४, लोणार ११११, मलकापूर १२७०, मेहकर २४७४, मोताळा १५०५, नांदुरा १६००, संग्रामपूर १५६३, शेगाव १३५६, सिंदखेड राजा १७२०.

बातम्या आणखी आहेत...