आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेरणी:गेल्या वर्षापेक्षा यंदा रब्बीचा पेरा वाढला ; खामगाव तालुक्यात 33 हजार हेक्टरवर नियोजन

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात यंदा रब्बी हंगामासाठी ३३ हजार १० हेक्टर जमिनीवर रब्बी पिकांचे नियोजन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. गेल्या वर्षी रब्बी हंगामात ३० हजार ९८६ हेक्टरवर पेरणी करण्यात आली होती. गतवर्षी झालेली प्रत्यक्ष पेरणी व यंदाच्या रब्बीच्या नियोजनाची आकडेवारी पाहता यंदा रब्बीचा पेरा वाढल्याचे दिसून येते.

यंदा पाऊस चांगला झाला आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे नुकसान भरुन काढण्यासाठी तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी रब्बी पिकांचे उत्पादन घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी शेतीच्या मशागतीची कामे सुरु केल्याचे चित्र आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा पोत हा चांगला असल्याने आजही शेतजमीन ओली आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना रब्बीचे उत्पादन घेण्यासाठी होणार आहे. साधारणतः रब्बी पिकाची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येते. परंतु अद्याप रब्बीची पेरणी तालुक्यात कुठेही सुरु झाली नसल्याची माहिती आहे. काही दिवसांत शेतकरी पेरणीला सुरुवात करणार आहे.

यंदा पाऊस चांगला झाल्याने तालुक्यातील धरणात मोठ्या प्रमाणावर जलसाठा निर्माण झाला आहे. तसेच विहिरींना देखील मुबलक पाणी आले आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना रब्बी पिकाचे उत्पादन घेण्यासाठी होणार आहे. यंदाच्या रब्बी हंगामात गहू ३ हजार ५०० हेक्टर, रब्बी ज्वारी १५० हेक्टर, हरभरा १६ हजार २०० हेक्टर, मका १ हजार २०० हेक्टर, करडी २० हेक्टर, कांदा ३ हजार ४०० हेक्टर, भाजीपाला १ हजार ४० हेक्टर, व इतर पिके १ हजार ५०० हेक्टर असे एकूण ३३ हजार १० हेक्टर जमिनीवर रब्बी पिकाचे नियोजन करण्यात आले आहे. परतीच्या पावसाने झालेले खरीप पिकाचे नुकसान शेतकरी रब्बीच्या उत्पादनातून भरुन काढणार आहेत.

यंदा हरभऱ्याचा पेरा वाढला
यंदाच्या रब्बी हंगामात ३३ हजार १० हेक्टर जमिनीवर रब्बीच्या विविध पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वाधिक नियोजन हे हरभऱ्याचे असून १६ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याच्या पेरणीचे नियोजन आहे. तर तर सर्वात कमी नियोजन हे करडईचे २० हेक्टर जमिनीवर करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...