आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जूनच्या पहिल्याच दिवशी पाऊस; शेतकऱ्याची लगबग

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या वर्षी ०.५ तर यंदा ०.४ मिमी पावसाची हजेरी; कपाशीच्या लागवडीची तयारी

गेल्या वर्षी प्रमाणेच या वर्षीही जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने बुलडाणा जिल्ह्यात अनेक भागात हजेरी लावली. गतवर्षी २ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी ०.५ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली होती. तर यंदा ०.४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. मात्र गतवर्षी २ जूनपर्यंत सरासरी २.६ मिलीमीटर पाऊस पडला होता. पावसाच्या संकेताने ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे. त्यांनी कपाशी लागवडीला सुरुवात केली आहे. तर कोरडवाहू शेतकऱ्यांनी मशागत करुन ठेवली आहे.

बुलडाणा जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ७६१.६ मिमी इतके आहे. गतवर्षी पर्जन्यमानाने सरासरी ओलांडली होती. ११९ टक्के पाऊस पडला होता. १ जूनपासून पर्जन्यमान मोजण्यास सुरुवात होऊन ऑक्टोबर अखेरपर्यंत पर्जन्यमानाची नोंद शासकीय दप्तरी घेतली जाते. आता मंडळाचे पर्जन्यमान तहसील स्तरावर कळू लागले आहे. त्यामुळे त्या भागातील पीक परिस्थितीही लक्षात येत आहे. ४ जूनपर्यंत बुलडाणा जिल्ह्यात पाऊस येणार असल्याचे भाकित हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी केले आहे. त्यानंतर पाऊस चांगला पडल्यानंतर पेरणीला सुरुवात कराव्यात अशा सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत. म्हणजे जमिनीत ओल असेल तरच पेरणी करण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी करण्याचे आवाहन करण्यात आले असले तरी सिंचन क्षेत्रात येत असलेल्या शेतीत कपाशीची लागवड सुरू झाली आहे. सोयाबीनचा पेराही काही शेतकरी करत आहेत. मात्र धूळ पेरणीला यंदा शेतकऱ्यांनी थारा दिलेला दिसत नाही. बियाणे खरेदी झाली असून घरचेच बियाणे वापरण्याचा सल्ला दिला जात आहे.

गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत झालेला पाऊस : बुलडाणा ०.३, चिखली ०.८, लोणार ३.१, मेहकर ०.१, खामगाव ०.५ असा एकूण ४.८ मिमी पाऊस पडला आहे. या पावसाची सरासरी ०.४ इतकी आहे. सरासरी ०.०५ टक्के हा पहिला पाऊस पडला आहे.

बातम्या आणखी आहेत...