आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून संविधानाची उद्देशिका शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात यावी, गायरान व वन जमिनीचे लाभार्थ्यांना पट्टे देण्यात यावे, ईव्हीएम मशीन बंद करण्यात यावी, जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यात यावेत आदी मागण्यासाठी गुरुवारी रिपाइंच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
विश्राम गृहापासून सुरू झालेल्या या मोर्चाचे नेतृत्व रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संतोष इंगळे यांनी केले. या मोर्चात जिल्हाभरातील रिपाइंचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. हा मोर्चा संगम चौक, जयस्तंभ चौक, इक्बाल चौक, कारंजा चौक, तहसील चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये यंदा परतीच्या पावसाने खरीप पिकाचे अतोनात नुकसान केले आहे.
हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, घरकुल लाभार्थ्यांना १ लाख २० हजारऐवजी अडीच लाख रुपये अनुदान देण्यात यावे, शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, खामगाव तालुक्यातील कासारखेड या गावात शाळा उपलब्ध करून देण्यात यावी, यासह इतर मागण्या करण्यात आल्या आहेत.
या मोर्चात तालुकाध्यक्ष संजय आराख, बाळू हिवाळे, विलास सरकटे, महेबूब शाह, संदीप शिंदे, रमेश मोरे, अमोल वानखडे, दयाराम वानखडे, गौतम सरदार, विलास वानखडे, अरविंद सरदार, प्रशांत वाकोडे, नितेश सरदार, तेजराव वानखडे, दयाराम वानखडे, विलास सुरडकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.