आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेमडेसिवीर @1500!:कोरोनाच्या उपचारातील रेमडेसिवीर आता आता सर्वसामान्यांना स्वस्तात उपलब्ध करून देणार, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. शिंगणे

बुलडाणाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • MRP पेक्षा कमी किमतीत रेमडेसिवीर सर्वसामान्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किमती कमी होणार असल्याचे संकेत राज्यातील अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत. त्यानुसार, कोरोनावर उपचार घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना हे इंजेक्शन घेण्यासाठी आता सरासरी 1500 रुपयांपेक्षा जास्त द्यावे लागणार नाहीत याची खबरदारी राज्य सरकार घेणार आहे. राज्यात कोविड-19 या साथरोगाचे रुग्ण ऑक्टोबर, 2020 ते जानेवारी 2021 या काळात बरेच कमी झाल्याचे दिसून आले होते. परंतु फेब्रुवारी, 2021 च्या मध्यापासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून दरदिवशी सुमारे 10,000 नवीन रुग्ण वाढत आहेत. आज रोजी राज्यात एक लाखाच्या वर सक्रीय रुग्ण आहेत. सदर परिस्थिती बघता राज्यात कोविड-19 या साथरोगाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही.

कोविड-19 आजाराच्या रुग्णांवरील उपचारासाठी बऱ्याच औषधांचा वापर होत असून प्रामुख्याने रेमडेसिवीर इंजेक्शन हे औषध या आजारावर प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. राज्यात जानेवारी, 2021 अखेर पर्यंत कोविड रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसून आले त्याचबरोबर रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी देखील कमी झाल्याचे दिसून आले. फेब्रुवारी, 2021 पासून रुग्णालये व रुग्णालयांना पुरवठा करणाऱ्या घाऊक विक्रेत्यांना या औषधाची विक्री किंमत कमी करण्यात आली परंतू छापील विक्री किंमत कमी करण्यात आली नाही. त्यामुळे सदर विक्री किंमत कमी करण्यात आलेल्या किमतीचा लाभ रुग्णांना न मिळता त्यांचेवर छापील विक्री किमतीनुसार आकारणी होत असल्याने ग्राहकांना नाहक आर्थिक भुर्दंड पडत असल्याचे दिसून आले.

याची दखल राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी घेतली. या प्रकरणी कार्यवाही करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. प्रशासनाने तपास केला असता रेमडेसिवीर इंजेक्शन उत्पादकांनी सदर औषधाची विक्री रुग्णालयांना तसेच रुग्णालयांना पुरवठा करणाऱ्या घाऊक विक्रेत्यांना 800 ते 1,300 रुपयांनी केली. अर्थातच सरासरी 1,040/- रुपये किंमत आकारली. काही रुग्णालये रुग्णांना 10 ते 30% अधिक रक्कम आकारून छापील किमतींपेक्षा कमी दराने देतात. तर काही हॉस्पिटल छापील किंमतच आकारून नफा मिळवत असल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यामुळे याबाबत अन्न व औषध प्रशासनाने याबाबत दखल घेवून सदर रेमडेसिवीर इंजेक्शनची उत्पादकांची विक्री किंमत व प्रत्यक्षात रुग्णांना आकारण्यात येणारी किंमत यामधील तफावत कमी करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यास सुरुवात केली. यासंदर्भात सदर रेमडेसिवीर इंजेक्शन उत्पादित करणाऱ्या उत्पादकांची 6 मार्च आणि 9 मार्च रोजी अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या उपस्थितीत बैठका घेण्यात आल्या. रुग्णालयांची देखील 8 मार्च रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकांमध्ये याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बहुतांश रुग्णालये खरेदी किंमत कमी असूनदेखील रुग्णांना छापील किंमत आकारीत असल्याचे दिसून आले आहे. याबाबतचा प्रशासनाने शासनास सविस्तर अहवाल सादर केला. सरकारने रुग्णालयांना सदर रेमडेसिवीर इंजेक्शनच्या खरेदी किंमतीवर जास्तीत जास्त 30% जास्त किंमत आकारण्याबाबत निर्देश दिले. त्यामुळे, आता रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किमती कमी होणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...