आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालन नाही:रस्त्यावर बसवलेले फायबरचे गतिरोधकच ठरताहेत जीवघेणे ; आरोग्याच्या समस्यांचा करावा लागतोय सामना

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अपघातांना आळा घालण्यासाठी शहरात सध्या गतिरोधक उभारण्यात येत आहेत. मात्र अपघात टाळण्यासाठी टाकण्यात आलेले हेच गतिरोधक अपघातासाठी कारण ठरत आहेत. हे गतिरोधक फायबरचे असल्याने डांबरी गतिरोधकापेक्षा थोडे त्रासदायक आहेत. त्यामुळे मणक्यांचे व खांदे निखळण्याचे आजार बळावण्याची शक्यता आहे. तर हे गतिरोधक रबरी असल्याने लवचिक असल्याचे बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. शहरात गतिरोधकांपैकी अनेक गतिरोधक हे निकषानुसार तयार केलेले नाहीत. या गतिरोधकांची उंची, लांबी व रुंदी किती असावी, याचे कुठलेही तंत्रज्ञान लक्षात न घेता शहरात हवे त्या पद्धतीने सिंमेंटचे, डांबराचे गतिरोधक तयार करण्यात आले होते. सिमेंटचे हे गतिरोधक तर फायबरच्या गतिरोधकांपेक्षाही त्रासदायक आहेत. त्यावरुन वाहन जरी नेले तरी ते गतिरोधकाला घासते, अशी परिस्थिती शहरातील अंतर्गत भागाची आहे. शहरात सिमेंटचे गतिरोधक इंदिरा नगर, कारंजा चौकातील राम मंदिर परिसर, विदर्भ हाउसिंग कॉलनी, डीएसडी मॉल यासह आदी भागात बांधण्यात आले आहेत. पाच इंचापेक्षा अधिक उंचीचे हे गतिरोधक असून गतिरोधकांची आवश्यकता आहेच. मात्र ते पसरट असणे आवश्यक आहे.

पालिका वाहतुकीच्या नियमांबाबत अनभिज्ञ इंडियन रोड काँग्रेसच्या निकषांनुसार गतिरोधकांची उंची १० सेंमी असावी. दोन्ही बाजूला ३-३ मीटरचे स्लोप असावेत. जेणेकरून वाहन विना झटका आरामाने गतिरोधक पार करेल. त्यावर थर्मो प्लास्टिक पेंटचे पट्टे मारलेले असावेत. ६ ते ८ इंच उंच व विना स्लोप गतिरोधक नसावेत. परंतु, शहरात असे काहीच नाही. मन मानेल तसे गतिरोधक अंतर्गत रस्त्यावर तयार करण्यात आले आहे.

गतिरोधकापूर्वी पालिकेने पांढरे पट्टे मारले नाहीत दुरूनच गतिरोधक असल्याचे वाहनचालकांना चटकन लक्षात यावे. यासाठी गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी तर रिफ्लेक्टर असणे आवश्यक असते. परंतु, महामार्ग वगळता शहरातील गतिरोधकांवर ते मारण्यात आलेले नाहीत. हे पट्टे मारावे लागतात याचा नियम नगर पालिकेला माहिती नाही. फक्त रस्ते बनवले म्हणजे झाले असेच जणू काही पालिकेला वाटत असावे.

मणक्यांचे जडतात विकार ^शहरातील रस्ते असो वा गतिरोधक असो. त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. या गतिरोधकांमुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात शारीरिक त्रासाचा सामना करावा लागतो. गतिरोधकांमुळे बसणाऱ्या झटक्यांमुळे मणक्याचे विकार उद्भवतात. त्यामुळे पाठदुखी, कंबरदुखी, स्पाँडियलासटीस आदी कायमस्वरूपी पाठी लागणाऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो. -डॉ. संजय पाटील, अस्थिरोग तज्ञ

बातम्या आणखी आहेत...