आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविकांनी दर्शन घेत चढवल्या चादरी‎:लाखो भाविकांच्या साक्षीने‎ चढला सैलानी बाबाचा संदल

मोहम्मद शफी |धाड14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान‎ असलेल्या पिंपळगाव सराई येथील‎ प्रसिद्ध सैलानी बाबाच्या यात्रेला‎ खर्या अर्थाने होळीपासून सुरुवात‎ झाली. दरम्यान, आज १२ मार्च‎ रोजी रात्री उशिरा उत्साहात संदल‎ चढला. मागील तीन वर्षाचा‎ यात्रेला पडलेला खंड पाहता‎ यावर्षी मिळेल त्या वाहनाने‎ भाविक यात्रेत दाखल झाले होते.‎ होळीच्या दिवशी पावसाने हजेरी‎ लावल्याने लाखोंच्या संख्येत‎ आलेल्या भाविकांना अडचणींचा‎ सामना करावा लागला. त्यामुळे‎ मागील चार दिवसांपासून यात्रेत‎ भाविकांची संख्या कमी झाली‎ होती.‎ निसर्गरम्य अजिंठा डोंगर‎ कुशीत वसलेल्या पिंपळगाव सराई‎ येथे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान‎ हाजी अब्दुल रहेमान उर्फ सैलानी‎ बाबा यांचा दर्गा आहे. सैलानी‎ बाबाचे मनोभावे दर्शन घेण्यासाठी‎ होळी व संदलमध्ये सहभागी‎ होण्यासाठी भाविक थव्या थव्याने‎ यात्रेच्या ठिकाणी दाखल झाले‎ होते. संदल चढल्यानंतर व फातेह‎ खाणी झाल्यानंतर यात्रा‎ ओसरायला सुरुवात होत असते.‎

तब्बल महिनाभर चालणाऱ्या या‎ यात्रेत गेल्या आठवडा भरापासून‎ भाविक व विविध व्याधींनी ग्रस्त‎ रुग्णांची गर्दी वाढली होती. यात्रा‎ परिसरात भाविकांनी जागा मिळेल‎ तीथे झोपड्या तसेच राहुट्या‎ उभारल्या होत्या.‎ यात्रेत भाविकांना येण्यासाठी‎ परिवहन महामंडळाच्या अकोला,‎ औरंगाबाद, जालना, नांदेड,‎ बुलडाणा, चिखली यासह इतर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आगारातून बसेस सोडण्यात येत‎ असून कही भावी खासगी वाहनाने‎ सुद्धा डेरेदाखल झाले आहेत. रात्री‎ आठ वाजेच्या सुमारास पिंपळगाव‎ सराई येथील संदल घरातून‎ विधिवत व पारंपारिक पद्धतीने‎ शफी मुजावर, चांद मुजावर,‎ कादीर मुजावर व इतरांनी विधी‎ पार पडून उंटणीवर ढोल-ताशांच्या‎ गजरात लाखो भाविकांच्या साक्षीने‎ संदल सैलानी बाबाच्या दर्गा‎ रस्त्याला लागला.‎ यावेळी रस्त्यात मोठ्या प्रमाणात‎ पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला‎ होता. संदल चढल्यानंतर‎ भाविकांनी दर्शन घेवून परतीचा‎ रस्ता धरला. त्यामुळे रस्त्यावर‎ भाविकांची मोठी गर्दी झाली होती.‎ सैलानीबाबांची यात्रा शांततेत पार‎ पडली.‎

यात्रेवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर‎
आज सैलानी बाबाचा संदल‎ निघणार असल्यामुळे लाखोंच्या‎ संख्येने भाविक सैलानीत दाखल‎ झाले होते. संदल दरम्यान कुठलीही‎ अनुचित घटना घडू नये, यासाठी‎ ड्रोन कॅमेरे कार्यान्वित करण्यात‎ आले होते.‎

रुग्ण वाहिकेसह आरोग्य‎ यंत्रणा तैनात‎
यात्रेत कोणत्याही प्रकारचा प्रसंग‎ निर्माण होवू नये, यासाठी जिल्हा‎ प्रशासनाने खबरदारी घेत यात्रेतील‎ रस्ते मोठे केले होते. तसेच रुग्ण‎ वाहिका अग्निशमन दलाच्या तीन‎ गाड्या तैनात करण्यात आल्या‎ होत्या. त्या सोबतच आरोग्य यंत्रणा‎ तैनात करण्यात आली होती.‎

बातम्या आणखी आहेत...